आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी

मुंबई : विधिमंडळाच्या आवारात निदर्शने करताना एका आमदाराने एका तरुण मंत्र्यांला हिणवण्यासाठी असभ्यपणे आवाज काढल्याचा व असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचा विषय शुक्रवारी विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. त्यास र्पांठबा देत आमदारांचे सभागृहाबाहेरील वर्तन कसे असावे याची आचारसंहिता तयार करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार बसून घोषणाबाजी करीत असतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच म्याव.. म्याव असा आवाज काढण्यात आला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांना ट्वीट करून डिवचले होते. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी या मुद्दा उपस्थित करीत संबंधित आमदाराच्या विरोधात कारवाईची मागणी केली. अशा आमदारांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रभू यांनी केली.  अशा पद्धतीने नक्कल व आवाज काढणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोणाचीही मानहानी होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगत फडणवीस यांनी स्वपक्षीय आमदाराचे कान टोचले.

 यथा राजा तथा प्रजा अशी म्हण आहे. प्रत्येक आमदार, मंत्री याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. हातवारे करून, आवाज काढून असभ्य वर्तन करून एकमेकांना हिणवले जाणार असेल तर यालाच राजकारण म्हणतात असा समज होऊन अगदी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी असेच वागू लागतील असा धोका आहे. त्यामुळे वर्तनाबाबत आचारसंहिता असावी व ती तयार करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mla angry over teasing aditya thackeray code of conduct applicable in vidhan bhavan akp