निवडणुकीसाठी केलेला २० कोटी रुपयांचा खर्च ‘वसूल’करण्यासाठी ओवळा-माजिवाडाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी निवडणुकीत जोरदार टक्कर देणारे भाजपचे पराभूत उमेदवार संजय पांडे यांच्या कार्यालयात शिरून त्यांच्या व्यवस्थापकाला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खर्च परत न केल्यास जगणे मुश्कील करेन आणि बरबाद करेन, अशी धमकी सरनाईक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे धमकीनाटय़ कार्यालयातील सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त झाले असून त्याचे चित्रण पांडे यांनी पोलिसांकडे दिले आहेत. मात्र सीसीटीव्ही चित्रणाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी दिली.  
या निवडणुकीत मतमोजणीत सुरूवातीपासूनच आघाडीवर असलेले पांडे यांनी सरनाईकांना घाम फोडला होता. शेवटच्या फेऱ्यांमध्ये सरनाईकांनी आघाडी घेत विजय मिळविला. असे असताना आता सरनाईक यांनी पांडे यांच्या मालकीच्या ‘महाकाली डेव्हलपर्स’च्या पोखरण रोड परिसरातील कार्यालयात शिरून त्यांचे व्यवस्थापक ओमप्रकाश मिश्रा यांना धमकाविल्याची घटना समोर आली आहे. २९ ऑक्टोबर रोजी सरनाईक हे १० ते १२ साथीदारांसह पांडे यांना धमकाविण्यासाठी गेले होते. मात्र, तेव्हा ते कार्यालयात नव्हते. त्यामुळे त्यांनी पांडे यांचे व्यवस्थापक मिश्रा यांना धमकावले, असे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी संजय पांडे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार सरनाईक यांच्याविरोधात कार्यालयात शिरून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा