शिवाजी पार्क परिसरात प्रायोगिक तत्वावर वायफायचा प्रकल्प राबवून दादरकरांची मने जिंकण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नाला मनसेने सुरुंग लावला आहे. शिवाजी पार्क परिसरात वायफाय उपलब्ध करण्याची प्रक्रिया मनसेने आधीच सुरू केली असून नवी जागा शोधण्याचा सल्ला शिवसेनेला देण्यात आला आहे. परिणामी वायफायच्या मुद्दय़ावरून शिवसेना-मनसे आमनेसामने ठाकण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करण्याची संकल्पना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानुसार मुंबईत वायफाय उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर शिवाजी पार्कमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बुधवारी महापौर बंगल्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. वायफाय सुविधा कशी असेल, याचे सादरीकरणही या बैठकीत करण्यात आले.दरम्यानच्या काळात मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्येच वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापौर बंगल्यावर झालेल्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मनसेतर्फे ही सुविधा देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याची प्रक्रियाही सुरू झाली असून येत्या काही दिवसांमध्ये शिवाजी पार्कमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे शिवसेनेने प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यासाठी दुसरी जागा निवडावी, असा सल्ला संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा