शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना १७ अन्य आरोपींसह सत्र न्यायालयाने एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गत २०१४ लोकसभा निवडणुकीत मतदानाच्यादिवशी चेंबूरमध्ये ट्रॉम्ब येथे गोंधळ घालण्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कामिनी शेवाळे माजी नगरसेविका आहेत.

पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून मात्र न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्या प्रकरणी कामिनी आणि अन्य शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करुन या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. या संघर्षामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला होता.

न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली त्यावेळी कामिनी शेवाळे कोर्टात हजर होत्या. त्यांचे पती राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. कॉन्स्टेबल त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना ओळखू शकला नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी या सर्वांची हत्येचा प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता केली. २४ एप्रिल २०१४ रोजी एकूण १८ आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यामध्ये १३ पुरुष आणि पाच महिला होत्या.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास कामिनी शेवाळे यांनी शिवसैनिकांना एक गाडी थांबवण्यास सांगितली होती. या गाडीमध्ये मतदारांना वाटण्याचे पैसे असल्याचा त्यांचा दावा होता. कामिनी यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी त्या गाडीवर दगडफेक केली. कॉन्स्टेबल विकास ही गाडी तपासत असताना दगडफेकीत जखमी झाले होते. आरोपींनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितल्यामुळे शिक्षा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.