राहुल गांधी यांनी पंतप्रधानाबाबत केलेल्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली होती. मोदींच्या राहुल गांधी विरोधातील वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर कोणत्याही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

राहुल गांधींवर मोदींची टीका म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पाहावे वाकून यातला प्रकार: शिवसेना

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला होता. यावर ‘हो नक्कीच’ असे उत्तर राहुल गांधींनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मोदींनी प्रचारसभेत घेतला होता. कर्नाटकामध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत विचारला होता. मोदींच्या या भूमिकेवर शिवसेनेने सामना या आपल्या मुखपत्रातूनही टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका करणे म्हणजे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून यातला प्रकार आहे. काँग्रेसने भाजपाला विचारून त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी?, असा प्रश्न शिवसेनेने विचारला. भाजपाने ‘यूपीए’तील मित्रपक्षांची चिंता सोडावी व आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत जे खंजीर खुपसले गेले आहेत ते आधी पाहावे, असेही शिवसेनेने म्हटले होते.

या देशातील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहण्याचा हक्क आहे. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर देशातील कोणताही सेवक पंतप्रधान बनू शकतो, असे ते म्हणाले.

Story img Loader