दक्षिण मुंबईतून कोण लढणार? हा प्रश्न लोकसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून अनुत्तरीत होता. अखेर काल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यामिनी जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले. तत्पूर्वी या मतदारसंघात भाजपा की शिवसेना? यापैकी कोणता पक्ष उमेदवार देणार, यावरही बराच खल झाला. मात्र अखेर शिवसेनेने याठिकाणी उमेदवार दिला. यामिनी जाधव आता शिवसेना उबाठा गटाच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात उभ्या आहेत. शिंदे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली असली तरी तीन वर्षांपूर्वी त्यांना अपात्र ठरवावे, अशी शिफारस प्राप्तीकर विभागाने केली होती. त्यांनाच आता थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, तीन वर्षांपूर्वी प्राप्तिकर विभागाने निवडणूक आयोगाला शिफारस करून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना अपात्र करण्याची शिफारस केली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल सदर कारवाई करण्याचे प्राप्तिकर विभागाने सुचविले होते. मात्र त्यावेळी यामिनी जाधव यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची प्राप्तिकर विभाग, ईडीकडून चौकशी सुरू होती. मात्र २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात सहभागी होत जाधव दाम्पत्याने शिंदे गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर जाधव यांच्याविरोधातील चौकशी थंड झाली.
यामिनी जाधव २०२० साली अडचणीत आल्या होत्या. प्राप्तिकर विभागाने त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासल्यानंतर त्यांनी त्यात नमूद केलेल्या संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत आढळून आली. प्राप्तिकर विभागाने आपल्या अहवालात म्हटले की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी स्वतःकडे ७.५ कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले, तसेच त्यांच्या पतीकडे ४.६ कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले. तसेच प्रधान डीलर्स प्रा. लि. या कंपनीकडून त्यांनी एक कोटींचे कर्ज घेतल्याचे दाखविले होते. मात्र सदर कंपनी शेल (बोगस) कंपनी असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या तपासात निष्पन्न झाले. कोलकातामधील हवाला ऑपरेटर उदय शंकर महावर याने ही कंपनी उघडली होती.