भाजपने आपल्याला अंधारात ठेवून मुंबईमध्ये एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट परस्पर केंद्रीय कंपनीला देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेचा विरोध आता मावळला आहे. केवळ मरिन ड्राइव्ह येथील क्वीन नेकलेस पूर्ववत करा आणि मग मुंबईत एलईडी दिव्यांचा झगमगाट करा, अशी मवाळ भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र निविदा न मागविता केंद्रीय कंपनीला हे कंत्राट दिल्यास त्याविरोधात न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या मध्यस्थीने मुंबईच्या पदपथांवर एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव मुंबईतील भाजप नेत्यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासमोर मांडला होता. पालिका आयुक्तांकडूनही त्याला अनुकूलता दर्शविण्यात आली होती. मात्र या प्रस्तावाबाबत कोणतीच कल्पना न दिल्यामुळे शिवसेनेमध्ये  नाराजी पसरली होती.  शिवसेनेच्या विरोधाची गाडी मरिन ड्राइव्हमध्येच घुटमळत असल्याचे पाहून विरोधक अचंबित झाले. एलईडी दिवे बसविण्याचे कंत्राट निविदा न मागविता एकाच कंपनीला देण्यात आल्यास न्यायालयात धाव दाद मागण्यात येईल, असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी या वेळी दिला.