मुंबई : शालेय शिक्षणात हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदीची सक्ती पहिलीपासून कशासाठी असा सवाल त्यांनी केला. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. ते दादरच्या शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह येथील महाराष्ट्र कामगार सेनेच्या कार्यक्रमाला संबोधित करीत होते.

जे अमराठी मुंबईमध्ये राहताहेत, वर्षानुवर्षे, पिढ्यानं पिढ्या राहताहेत त्यांना ‘चला मराठी शिकवूया’ हे अभियान शिवसेनेने सुरू केले. त्याला उत्तर भारतीयांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे हे बघितल्यानंतर यांच्या पोटात गोळा आला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. इथे राहता, इथले मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता, असा सवाल करताना जसे आपण म्हटले होते ‘इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’ तसे ‘इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलनाही होगा, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

फडणवीसांनी घाटकोपरमध्ये मराठीची सक्ती करून दाखवावी

आम्ही अस्सल मराठी, मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही हे पुन्हा सांगतो. फडणवीसांना सांगतो तुमचे ते जोशी आले होते ना, मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याची जोशी यांच्या विधानाची आठवण करून देताना त्यांनी केली. ते जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये पहिल्यांदा तिथे मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी आलेच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचे काय आहे ते बघून घेतो. तिथला प्रत्येक माणूस मराठी बोलणारा दाखवा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाला. जो महाराष्ट्रामध्ये राहील त्यांना मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती करत असाल तर होऊ देणार नाही. – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

‘इतर भाषांचा द्वेष म्हणजे मातृभाषेवर प्रेम नाही’

स्वत:च्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही. इतर भाषांचा द्वेष करणे म्हणजे स्वत:च्या मातृभाषेवर प्रेम करणे नाही. आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगे नाही. परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो’, असे स्पष्ट मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात व्यक्त केले. अनेकांना उद्याोग किंवा कामानिमित्त परदेशात जावे लागते. अशा व्यक्तींना त्या देशातील भाषा अवगत असेल तर व्यवहार करणे सोपे होते. त्यामुळे ज्या देशात कामासाठी किंवा शिक्षणासाठी जाता, त्या देशातील भाषा शिकण्याचा निर्धार करायला हवा, असे राज्यपाल म्हणाले.

हिंदी ही राजभाषा आहे. अभ्यासक्रमात हिंदीचा समावेशाने राजकारण करून आंदोलन करणे, लोकांना मारहाण करणे योग्य नाही. देशातील ६० टक्के भागात हिंदी बोलली जात असल्याने ही भाषा सगळ्यांना यायला हवी. राज ठाकरे यांनी या विषयाला समजून घेतले पाहिजे. राज ठाकरे समजदार आहेत. त्यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

‘मराठी भाषेचे नुकसान सहन करणार नाही’

राज्य सरकारने आणलेले नवीन शैक्षणिक धोरण चुकीचे असून, त्यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान होईल. शिक्षकांचीही तयारी झालेली नाही. महाराष्ट्र बोर्डाचे काय होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती का करता? मराठी भाषेचे नुकसान सहन करणार नाही. लाखो रुपयांचे शुल्क भरून ज्या आंतरराष्ट्रीय बोर्डामध्ये मुले शिकतात, त्यांना हिंदी, मराठी सक्तीचे करणार का, असा प्रश्नही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.