शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी महापालिकेने केलेल्या पाच लाख रुपयांच्या खर्चावरून वाद उफाळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच लाखांचा धनादेश रुपये गुरुवारी महापालिकेत जमा केला. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हा धनादेश अतिरिक्त पालिका आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडे सुपूर्द केला.
स्थायी समितीमध्ये अंत्यसंस्काराच्या वेळी सीसीटीव्ही व एलइडीसाठी केलेल्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यानंतर ‘शिवसेनेला पाच लाख रुपये जड झाले का’ अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या एवढेच नव्हे तर शिवसैनिकांमध्ये आणि पालिका वर्तुळातही तसाच सवाल उपस्थित झाला होता.
महापौर सुनील प्रभू यांनी बुधवारी महापालिकेने केलेल्या पाच लाख रुपये खर्चाचे जोरदार समर्थन केले होते. एवढेच नव्हे तर आयुक्तांच्या अधिकारात हा खर्च यापूर्वीच करण्यात आला असून नियमानुसार केवळ माहितीसाठी तो स्थायी समितीत सादर करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे व सभागृहनेते यशोधर फणसे यांच्या उपस्थितीत महापौरांनी सांगितले. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर मनसेने अंत्यसंस्काराचा हा खर्च करण्याची तयारी दाखवली. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी हे पैसे मनसे भरेल असे जाहीर केले. यानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश पालिका अतिरिक्त आयुक्तांना पाठवून दिला.
उद्धव ठाकरे व्यथित
बाळासाहेबांसाठी लाखो लोक आपला जीव ओवाळून टाकण्यास तयार आहेत. पाच लाख रुपयांच्या खर्चासाठी स्थायी समितीच्या मंजुरीची गरज नाही. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थ असून याबाबच्या बातम्या वाचून त्यांना अत्यंत दु:ख झाले व त्यांनी तातडीने धनादेश पाठवून दिल्याचे अनिल देसाई यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंकडून ५ लाखांचा धनादेश महापालिकेला सुपूर्द
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी महापालिकेने केलेल्या पाच लाख रुपयांच्या खर्चावरून वाद उफाळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच लाखांचा धनादेश रुपये गुरुवारी महापालिकेत जमा केला. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हा धनादेश अतिरिक्त पालिका आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडे सुपूर्द केला.
First published on: 24-05-2013 at 02:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena pays rs 5 lakh to mcgm for expense incurred on bal thackerays funeral