मुंबईतील दहीहंडीवरील प्रसिद्धीचा झोत लाखोंच्या हंडय़ांमुळे उपनगराकडे वळल्याने दादरच्या हंडय़ांसाठी गर्दी खेचण्यासाठी आता भाजपा-मनसेमध्ये स्पर्धा सुरू झाली असून थेट शिवसेनेच्या मंडळांनाही आकर्षित करत मनसेने यात बाजी मारल्याचे चित्र दादरमध्ये दिसले. त्याचबरोबर उंच थर लावताना वाढत जाणाऱ्या डॉल्बीच्या आवाजामुळे गोविंदांना त्रास होत असल्याची जाणीव ठेवत थर लावताना दणदणाटाला आवर घालत दादरमधील आयोजकांनी शिस्तीचे दर्शन घडवत गोविंदांची सुरक्षा जपली.
अति उंच हंडी आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे, डीजे-डॉल्बीचा दणदणाट आणि वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या जीवावर ठाण्यातील राजकीय दहीहंडय़ा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दादर रेल्वेस्थानकाबाहेरची दहिहंडी प्रसिद्ध होती. दादरच्या रानडे रस्त्यावर दहीहंडी उत्सवात भाजप-मनसेत स्पर्धा झाली .
आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे रंगही गुरुवारी पाहायला मिळाले…
रेल्वे स्थानकाच्या जवळील भाजपाच्या हंडीपेक्षा नक्षत्र मॉलजवळील मनसेची हंडी पाहण्यासाठी अधिक गर्दी उसळली होती. तेच चित्र फुलबाजारातही होते. दादरमध्ये येणारी गोविंदा मंडळांची पथके मनसेच्या हंडीवर सलामी देण्यासाठी रांगा लावत होती. त्यात शिवसेनेच्या मंडळांचाही लक्षणीय सहभाग होता. त्यामुळे मनसेच्या हंडीवर सेनेच्या गोविंदांची सलामी असे चित्र सर्रास पाहायला मिळत होते.
दादरमध्ये दुपारी रांगडय़ा उत्साहात, दांडग्या जोशात पण बेदरकारपणाला मुरड घालत थोडी शिस्त पाळत दहीहंडीचा उत्सव साजरा होत असल्याचे चित्र होते. उंच थर लावण्यास सुरुवात झाली की आयोजकांकडून वाढवला जाणाऱ्या डॉल्बीच्या दणदणाटामुळे गोविंदांच्या हृदयगतीवर परिणाम होतो. त्यामुळे जीवघेण्या अपघाताचा धोका वाढतो याची जाणीव ठेवत दादरमधील हंडय़ांच्या ठिकाणी थर लावण्यास सुरुवात होताच आवाज कमी केला जात होता. पाण्याचा माराही आवरता घेतला जात होता. त्यामुळे थर लावण्यावर लक्ष केंद्रीत करणे गोविंदा मंडळांना शक्य होत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा