महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील धुसफूस मंगळवारी अधिकच तीव्र झाली. या भेटीवर तीव्र नाराजी प्रकट करतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत भाजपची कानउघाडणी केली. त्यानंतर ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी आणि भाजप शिवसेना युतीच अभंग आहे, हे पटविण्यासाठी वरिष्ठ भाजप नेत्यांनी मंगळवारी शिवसेनेसाठी पुन्हा ‘नमो-नमो’ चा सूर आळविला. नरेंद्र मोदी यांनीही रात्री दूरध्वनीवरून उद्धव यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्रात भाजपमध्ये निर्णय कोण घेतो आणि महायुतीच्या विरोधात उमेदवार उतरवून मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या मनसेचा पाठिंबा निवडणुकीनंतर घेणार का, असे स्पष्ट सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला केले. रालोआविरोधात उतरून पंतप्रधानपदासाठी मात्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाचा पाठिंबा घेणे ही केजरीवाल नीती झाली, असे त्यांनी भाजपला सुनावले.
ज्यांच्याकडे मते नाहीत, मुद्दे नाहीत तेच मोदींचा मुखवटा घालून मते मागत आहेत. मान या ना मान, मै तेरा मेहमान, अशी त्यांची अवस्था आहे, या शब्दांत त्यांनी राज यांची खिल्ली उडवली.
गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याने शिवसेनेत संताप आहे. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना भवनात सेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुखांसह सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ही पत्रकार परिषद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा