आर्थिक डोलारा डळमळीत झालेल्या बेस्टला पालिकेकडून ३७५ कोटी रुपयांची आर्थिक रसद पुरविण्याची तयारी शिवसेनेने दर्शविली आहे. मात्र ती मिळताच बेस्टने अलीकडेच केलेली बस भाडेवाढ मागे घ्यावी अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
बेस्ट उपक्रमाचा २०१४-१५ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मंगळवारी पालिका सभागृहात सादर केला. क्रूड तेलावर आकारण्यात येणाऱ्या ३ टक्के जकात करात ०.२५ टक्क्य़ांनी वाढ करावी आणि त्याद्वारे मिळणारे २२५ कोटी रुपये तसेच परिवहन निधीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करुन ते बेस्टला द्यावेत. तसेच आगामी अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद करुन तेही बेस्टला द्यावेत, असे शेवाळे यांनी  भाषणात म्हटले. मात्र मदत मिळताच बेस्टने केलेली भाडेवाढ रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या संदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सभागृहाने या संदर्भात निर्णय घ्यावा, आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगतिले.

Story img Loader