मुंबई : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचे कमळ चिन्ह अधिक प्रभावी असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या काही खासदारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे समजते. आगामी लोकसभा निवडणूक लढण्याच्या दृष्टीने शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे; पण शिंदे गटाच्या काही खासदारांनी शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हाऐवजी भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची मानसिकता व्यक्त केल्याचे उच्चपदस्थ सूत्राने सांगितले.
हेही वाचा >>> शिंदे समितीचा अहवाल १५ डिसेंबपर्यंत; हैदराबाद दौरा निष्फळ; राज्यभरात २८ हजार कुणबी नोंदी आढळल्या
शिंदे गटाच्या उमेदवारांनी कमळ चिन्हावरच लढावे, असा प्रस्ताव त्यांच्याकडून होता; पण भाजपची त्याला तयारी नाही. शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. अशा वेळी शिंदे गटाचे सर्वच उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढल्यास ठाकरे गटाला त्याचा फायदा होईल, असे भाजपचे गणित आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर राजकीय चित्र बदलले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल, असे चित्र आहे.
धनुष्यबाणापेक्षा भाजपच्या कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असे शिंदे गटातील काही नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी नावाचा आणि कमळ चिन्हाचा फायदा होऊ शकतो. यामुळेच कमळ चिन्हावर लढावे, अशी शिंदे गटाच्या काही खासदारांची इच्छा आहे. या खासदारांनी भाजपच्या नेत्यांकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यावर १८ पैकी १३ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या सर्व १३ खासदारांच्या मतदारसंघात भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. भाजप मात्र सर्व जागा सोडण्यास तयार नसल्याचे समजते.