मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तोडगा काढण्यात आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाने उमेदवार पुरस्कृत करून तिरकी चाल खेळली आहे. अजित पवार गटाचा उमेदवार आधीच रिंगणात असताना शिंदे गटाच्या या खेळीने भाजपने मैत्रीपूर्ण लढतीची तयारी सुरू केली आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेतून कोकण पदवीधरमधून संजय मोरे तर मुंबई पदवीधरमधून डॉ. दीपक सावंत यांनी माघार घेतली. नाशिक शिक्षकचा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आला असला तरी त्या मतदारंसघात अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने अपक्ष शिवाजी शेेंडगे यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे.
हेही वाचा >>> मराठा आरक्षण : न्या. शुक्रे आयोगाकडून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा सखोल अभ्यास
मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी शिवसेनेने आपले उमेदवार घोषित केले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी सांगितले. मुंबई शिक्षकमध्ये भाजपने शिवनाथ दराडे यांना उमेदवारी दिली आहे. पण दराडे यांनी भाजपचे अधिकृत म्हणून अर्ज भरलेला नाही. त्यांनी पुरस्कृत म्हणून अपक्ष अर्ज भरला आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे हेपण रिंगणात आहेत. या पाठोपाठ शिंदे गटाने शेंडगे यांची उमेदवारी पुरस्कृत केल्याने महायुतीतील तीन घटक पक्षांचे उमेदवार परस्परांच्या विरोधात रिंगणात आहेत. मुंबई, ठाण्यात एक तरी उमेदवार असावा यातून मुंबई शिक्षकमध्ये शिवसेनेने उमेदवार पुरस्कृत केल्याचे सांगण्यात येते.
मुंबई शिक्षकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ज. मो. अभ्यंकर, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे हे रिंगणात आहेत. याशिवाय महायुतीच्या तीन घटक पक्षांचे उमेदवार उभे आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मुंबईत फक्त १५ हजार मतदार आहेत. महायुतीत ठरल्याप्रमाणे शिंदे गटासाठी नाशिक शिक्षकमधून आमच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. पण मुंबई शिक्षकमध्ये शिंदे गटाने उमेदवार पुरस्कृत का केला हे आम्हालाही माहीत नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात येते.
कोकण पदवीधर’साठी १३ उमेदवार रिंगणात
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार राहिले आहेत. भाजपच्या वतीने पुन्हा एकदा निरंजन डावखरे हे अधिकृत उमेदवार असल्याचे घोषित करण्यात आले, तर काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार असल्याचे चित्र आहे.
नलावडे, अभ्यंकर शिक्षकविरोधी कपिल पाटील
मुंबई : मुंबईतील शिक्षकांची वेतन खाती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (मुंबै) वळवण्यासाठी शिवाजी नलावडे यांना तर ज. मो. अभ्यंकर यांना शिक्षण क्षेत्रातील हितसंबंध असणाऱ्या गटाने मुंबई शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून मैदानात उतरवले असून हे दोन्ही उमेदवार शिक्षक आणि शिक्षणविरोधी आहेत, असा आरोप ‘शिक्षक भारती’चे आमदार कपिल पाटील यांनी केला. मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिक्षक भारतीने सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांतून भाजपचे उमेदवार लढत आहेत. शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर उमेदवार पुरस्कृत केल्याने मैत्रीपूर्ण लढत होईल. दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय होईल.
– आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष
शिवसेनेचे दोन, अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने ते आमच्या पथ्यावरच पडणार आहे. शिक्षक भारतीचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होईल.- कपिल पाटील, आमदार शिक्षक भारती