मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी  धरला होता. यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना  पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असे खासदारांनी मला सांगितले होते, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले.  द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत नंदुरबारमधील विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, पालघरच्या निर्मला गावित अशा आदिवासी समाजात काम करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली असून आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा आग्रह या शिवसैनिकांनी केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्ष-आघाडी न पाहता व्यापक विचार करून पाठिंबा देणे ही शिवसेनेची परंपरा आहे. प्रतिभाताई पाटील यांना महाराष्ट्रातील उमेदवार म्हणून तर प्रणव मुखर्जी यांना त्यांचा राजकीय अनुभव, ज्ञान व देशपातळीवरील प्रतिमा लक्षात घेऊन शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तीच परंपरा कायम ठेवत आता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता द्रौपदी मुर्मू या भाजपच्या उमेदवार असल्याने त्यांना मी विरोध करायला हवा होता. पण, मी तेवढय़ा कोत्या मनाचा नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

ठाकरेंच्या भूमिकेचे तावडेंकडून स्वागत

रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयासाठी त्यांचे आभार मानतो. देशाच्या स्वातंत्र्यांची ७५ वर्षे होत असताना एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केली़

मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी नको

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याबरोबरील आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराची व शपथविधीची परवानगी देऊ नय़े  कारवाईची टांगती तलवार असलेल्यांना मंत्रीपदाची शपथ देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.

काँग्रेसची टीका

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेची भूमिका अनाकलनीय असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. हा निर्णय घेताना शिवसेनेने आमच्याशी चर्चा केली नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena support bjp draupadi murmu presidency election ysh
Show comments