शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्क येथे भव्य स्मारक साकारण्याचा डाव शिवसेना नेत्यांनीच केलेल्या गाजावाजामुळे फसल्यानंतर शिवसेनेने आता गनिमी काव्याने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव महापौर सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्तांकडे ठेवला आहे. प्रत्यक्षात या उद्यानाच्या नावाखाली बाळासाहेबांचे स्मारक व व्यंगचित्र दालन उभारण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
मुंबई महापालिकेच्या मालकीचा महालक्ष्मी येथील आठ लाख ५५ हजार चौरस मीटरचा हा भूखंड १९१४ पासून सातत्याने ‘रॉयल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लब’ला भाडय़ाने देण्यात आला आहे. घोडय़ांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेली ही जागा केवळ श्रीमंतांसाठी असून सर्वसामान्य मुंबईकरांना याचा कोणताच लाभ होत नसल्याचा ‘साक्षात्कार’ सुनील प्रभू यांना अचानक झाला. त्यानंतर महापौरांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून ‘रॉयल वेर्स्टन इंडिया टर्फ क्लब’चा करार ३१ मे २०१३ रोजी संपुष्टात येत असल्यामुळे रेसकोर्सची जागा पालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी, अशी मागणी केली आहे.
या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन मैदान, उपवन व उद्यानाचा विकास केल्यास करदाते मुंबईकर त्याचा लाभ घेऊ शकतील असेही महापौरांनी पत्रात म्हटले आहे.
गेली वीस वर्षे मुंबईत सत्ता असलेल्या शिवसेनेला रेसकोर्सचा वापर केवळ श्रीमंतांकडून होत असल्याची उपरती अचानक झाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
मात्र, यामागे शिवसेनाप्रमुखांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्याची छुपी कल्पना आहे.  करार संपल्यानंतर रेसकोर्सची जागा पालिकेने ताब्यात घेतल्यास तेथे बाळासाहेबांच्या नावे बॉटनिकल गार्डन, बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे दालन अशा स्वरुपात बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची योजना सेनेच्या एका खासदाराने तयार केली आहे. ती अमलात आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे.
शिवसेनेच्याच एका नेत्याच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचे स्मारक उभारण्यावरून गोंधळ घातला गेला. तसेच पालिकेतील स्वयंभू नेत्यांनी शिवाजी पार्कचे नाव बदलण्यापासून जागोजागी बाळासाहेबांचे नाव देण्याच्या सूचनांचा पाऊस पाडला. त्यामुळेच बाळासाहेबांच्या योग्यतेची जागा देण्याबाबत सरकार सावध झाले.
महापौर निवास्थानाशेजारील जागेसाठीचे प्रयत्नही राजकीय ‘श्रेय’वादातून मागे पडले. या पाश्र्वभूमीवर रेसकोर्सवर बाळासाहेबांचे स्मारक उभारताना राज्य शासन अथवा कोणाकडूनही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मुंबईकरांसाठी भव्य उद्यान उभारण्याच्या नावाखाली रेसकोर्सची जागा ताब्यात घेण्याची योजना आखण्यात आल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader