आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी  विशाल महायुती करण्याच्या पडद्यामागील हालचालींचा शिवसेना-मनसेकडून इन्कार करण्यात येत असला तरी, राज ठाकरे महायुतीत आले तर रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची काय भूमिका राहणार, याची चाचपणी सेनेतील काही महत्त्वाच्या नेत्यांनी सुरु केली आहे. राज यांच्याकडून प्रस्ताव आला, तर विचार करु, असे मत आठवले यांनी व्यक्त केल्याने त्यांचा विरोध मवाळ झाल्याचे मानले जात आहे.  
महायुतीत मनसेला घेण्यास रामदास आठवले यांचा विरोध आहे. परंतु मनसेला वगळून राज्यात सत्ता परिवर्तन करता येणार नाही, याची जाणीव सेना-भाजपला आहे, त्यामुळे आठवले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोकसत्तामधील वृत्ताबद्दल सेनेच्या एका महत्वाच्या नेत्याने आठवले यांची प्रतिक्रिया निचारली असता, मनसेची महायुतीत गरज आहे का, याचा विचार उद्धव ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांनी करावा, प्रत्यक्ष राज यांच्याकडूनच तसा प्रस्ताव आला तर, त्यावर आपली चर्चा करण्याची तयारी आहे, असे आठवले म्हणाले.

सत्ताधारी गोटातही धाकधूक
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसे-भाजप-आरपीआय अशी युती करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या वृत्तावर राजकीय सोयीचा भाग म्हणून सेना-मनसेचे नेते इन्कार करीत असले तरी, संभाव्य नव्या राजकीय समिकरणाने सत्ताधाऱ्यांच्या गोटातही धाकधूक सुरु झाली आहे. मनसेसह सेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली तरी, त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेही व्यक्त केली आहे. मात्र, मनसेसह विरोधकांची विशाल युती झाल्यास त्याचा फटका आघाडीला बसेल, अशी भीती दाखवत आगामी निवडणुकांमध्ये समझोता व जागावाटपासाठी परस्परांवर दबावाची खेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.

Story img Loader