मुंबई: मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे. देवनारची कचराभूमी धारावी प्रकल्पासाठी देण्यासाठी कचरा शुल्कातील निधीतून देवनार कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे हा कर लावण्यास विरोध असल्याची भूमिका आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे.

धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना घरे देण्यासाठी धारावी प्राधिकरणाने देवनार कचराभूमीची जागा मागितली आहे. या कचराभूमीवरील जुने कचऱ्याचे डोंगर साफ करून जमीन लवकरात लवकर रिकामी करून देण्याचे आदेश राज्य सरकारने पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यासाठी पालिकेला ३००० कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांवर कचरा शुल्क लावून तो निधी देवनारचा कचरा साफ करण्यासाठी वापरला जाणार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. हा भूखंड मुंबईकरांच्या पैशातून साफ करून संबंधित व्यावसायिकाता देण्यात येणार आहे. त्यामुळे या धोरणाचा रस्त्यावर उतरून निषेध करू असा इशाराही त्यांनी दिला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला होता. मात्र आताचे सरकार पुन्हा एकदा मुंबईकरांवर लहान लहान घरांमध्ये राहणाऱ्यांवर, लघु उद्योगांवर कचरा शुल्कच्या माध्यमातून कर लावत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचे सुतोवाच मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी आगामी अर्थसंकल्पात केले होते. हे कचरा शुल्क लावण्याकरीता मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता उपविधी २००६ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचा मसुदा १ एप्रिल रोजी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता आणि आरोग्य उपविधी २००६ हे सध्या लागू आहेत. या उपविधीमध्ये कालसुसंगत तसेच विविध शासकीय, प्रशासकीय बदलानुसार योग्य तो आढावा घेऊन नवीन मसुदा तयार करण्यात आला आहे.

सगळ्याच बाबतीत भलामोठा व्याप असलेल्या मुंबई शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही अवाढव्य आहे. एका शहराचा संपूर्ण अर्थसंकल्प जितका असतो तितका निधी केवळ घनकचरा व्यवस्थापनासाठी मुंबई महापालिका करत असते. दरदिवशी निर्माण होणाऱ्या तब्बल सहा हजार मेट्रीक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे शिवधनुष्य मुंबई महानगरपालिका उचलत असते. येत्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढणार आहे. घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा वापर घनकचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये सुधारणा अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याकरिता वापरण्यात येणार आहे.