लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देत सरकारी कामकाजामध्ये मराठी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नव्याने बांधण्यात आलेल्या सीटीस्कॅन व एमआरआय केंद्राचा फलक इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. त्याची माहिती घाटकोपर येथील शिवसेना ठाकरे गटाला कळल्यानंतर त्यांनी रुग्णालयामध्ये धाव घेत तातडीने मराठीत नामफलक लावण्याचा इशारा सीटीस्कॅन व एमआरआय केंद्राचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दिला. यावेळी कंत्राटदाराने तातडीने नामफलक बदलण्याचे आश्वासन दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील सेठ वी. सी. गांधी आणि एम. ए. वोरा राजावाडी रुग्णालयामध्ये सर्वसामान्य रुग्णांना सीटीस्कॅन आणि एमआरआय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाने सीटीस्कॅन आणि एमआरआय केंद्र बांधण्यात आले आहे. हे केंद्र बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने मॅक्सिस हेल्थ केअर इमॅजिन या खासगी संस्थेला दिले आहे. संस्थेने केंद्र बांधण्याचे काम पूर्ण करून केंद्राचे नाव असलेला मोठा नामफलक इंग्रजीत लावला.

त्याची माहिती घाटकोपरमधील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना कळताच शिवसेना विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख चंद्रपाल चंदेलिया, शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर सेनेचे सचिव सचिन भांगे व चंद्रकांत हळदणकर यांनी धाव घेत केंद्राचा नामफलक मराठीत लावण्यात यावा, असा मागणीवजा इशारा मॅक्सिस हेल्थ केअर इमॅजिन संस्थेचे व्यवस्थापक शैलेश त्रिवेणी यांना दिला. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे मॅक्सिस हेल्थकेअर इमॅजिन इंडियाने नामफलक बदलून तो त्वरित मराठीत लावण्यात येईल, असे आश्वासन शिवसैनिकांना दिले.

एकीकडे मराठी भाषेला सर्वत्र सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आंदोलन केल्यानंतर अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही तिच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात सीटीस्कॅन आणि एमआरआय केंद्राचा नामफलक इंग्रजी भाषेत लावला जाणे खेदजनक आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन फलक त्वरित बदलावा अशी मागणी कंत्राटदाराकडे करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश वाणी यांनी दिली.

कंत्राटदाराने इंग्रजीत फलक लावण्यासंदर्भातील कोणतीही तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली नाही. मात्र या प्रकरणाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. -डॉ. भारती राजुलवाला, वैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय