लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेनेने (ठाकरे) विरोध केला आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात जाऊन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निवेदन दिले. तर मंगळवारी शिवसेनेने (ठाकरे) भगवती रुग्णालयाच्या आवारात आंदोलन केले.
बोरिवलीतील मुंबई महानगरपालिकेच्या हरिलाल भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होत आले असून नूतनीकरण केलेले ४९० खाटांचे रुग्णालय लवकरच नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. याअंतर्गत भगवती रुग्णालयातही पीपीपीचे धोरण राबवले जाणार आहे. त्यासाठी संस्थेची नेमणूक करण्याकरीता मुंबई महानगरपालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. मात्र दुसऱ्या संस्थेकडे भगवती रुग्णालया चालवण्यास देणे हे खासगीकरण असल्याचा आरोप करीत शिवसेनेने (ठाकरे) या निर्णयाला विरोध केला आहे.
मुंबई महापालिकेने रुग्णालय चालवण्यासाठी संस्था नेमण्याकरीता जी निविदा काढली आहे त्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोपही घोसाळकर यांनी केला आहे. त्यामुळे विशिष्ट संस्थेला काम देण्याचा महापालिका प्रशासनाचा उद्देश असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.
भगवती रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम २०१० मध्ये सुरू झाले. त्यासाठी मुंबई महानगरपालिका ३२० कोटी रुपये खर्च करीत आहे. या ठिकाणी ९ मजल्यांचे ४९० खाटा असलेले रुग्णालय उभे राहात आहे. निवेदनुसार १४७ खाटा मुंबई शहर व उपनगरातील पिवळ्या, तसेच भगव्या शिधावाटप पत्रिका व महापालिका कर्मचारी तसेच नगरसेवक आणि कुटुंबियांना निश्चित दराने रुग्णसेवा देण्यात येईल. मात्र इतर रुग्णांना खाजगी रुग्णालयाप्रमाणे दर आकारण्यात येतील. त्यामुळे सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तसेच रस्ते अपघात पूरपरिस्थिती व नैसर्गिक आपत्ती या परिस्थितीत रुग्णांना मोफत उपचार मिळू शकणार नाहीत, अशीही भीती घोसाळकर यांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेने हे धोरण व निविदा रद्द कराव्यात. मुंबई महापालिकेने अंधेरी ते दहिसर, ठाणे, पालघर येथील नागरिकांना उपयुक्त असलेल्या भगवती रूग्णालयाचे प्रचलन व परिरक्षण करून येथील गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्य सेवा द्यावी, अशी मागणी यावेळी विनोद घोसाळकर यांनी केली. यावेळी माजी आमदार विलास पोतनीस, विभाग प्रमुख उदेश पाटेकर, माजी नगरसेवक सुजाता पाटेकर, हर्षद कारकर, योगेश भोईर आणि शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
निविदापूर्व बोली बैठक रद्द
दहिसरमधील माजी आमदार, उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (ठाकरे) सोमवारी पालिका मुख्यालयात जाऊन या निविदापूर्व बोली बैठकीत शिरून विरोध केला व ही बैठक रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतर मंगळवारी मुन्सिपल कामगार सेना व शिवसेना (ठाकरे) विभाग क्र.१ यांच्यावतीने भगवती रुग्णालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
खासगीकरण होऊ देणार
मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात भगवती रुग्णालयाचे पीपीपी तत्त्वावर प्रचलन आणि पर्यवेक्षण करण्याचे जाहीर केले असून त्यामुळे रुग्णसेवा व उपचार माहागणार आहेत. महापालिका प्रशासकांचा हा डाव उधळून लावून कुठल्याही परिस्थितीत खाजगीकरण होऊ देणार नाही असा इशारा शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी यावेळी दिला. बोरिवली येथील भगवती रुग्णालय पश्चिम उपनगर, तसेच पालघर वसई विरार येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
बोरिवली रेल्वे स्थानक येथील बॉम्ब स्फोट, २००५ साली अतिवृष्टी, तसेच करोना कालावधीत भगवती रुग्णालयातील डॉक्टर्स परिचारिकांनी येथील नागरिकांना उत्तम उपचार व सुविधा दिल्या. गोरेगाव ते पालघर मिरा भाईंदरपासून वापीपर्यंत गरीब आदिवासी व मध्यमवर्गीयांना कमी दरात उपचार देणारे भगवती रुग्णालय हे उत्तर मुंबईतील एकमेव रुग्णालय आहे. महानगरपालिकेने जबरदस्तीने खाजगीकरण करण्याचा घाट घातल्यास प्रसंगी तीव्र आंदोलन करू, परंतु कोणत्याही परिस्थितीत भगवती रुग्णालय खाजगी संस्थेच्या ताब्यात जाऊ देणार नाही, असा इशारा विनोद घोसाळकर यांनी दिला.