लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतर्फे (ठाकरे) बुधवारीही हंडा मोर्चा काढण्यात आला होता. परळ, शिवडी, वरळी, प्रभादेवी, ग्रॅन्ट रोड येथील विभाग कार्यालयावर बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. पोलिसांनी मंगळवारप्रमाणेच बुधवारीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले. मात्र परळ, शिवडीतील शिवसैनिकांनी पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात घुसून ‘पाणी द्या पाणी द्या …नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशी घोषणाबाजी केली. तर वरळी प्रभादेवीतील शिवसैनिकांनी विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
अपुरा व दुषित पाणीपुरवठा, मुंबईकरावर लावण्यात येणारा कचरा कर, रस्त्यांची नित्कृष्ट व अर्धवट राहिलेली कामे अशा विविध प्रश्नांसाठी शिवसेनेने (ठाकरे) या आठवड्यात ठिकठिकाणच्या मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन केले आहे. पहिल्याच दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड केली. गिरगाव, दादर आणि वडाळा परिसरात शिवसैनिकांना मोर्चा काढूच दिला नाही. वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण कार्यालयावर आणि शिवडी, परळचा समावेश असलेल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयावर बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी आधीच नाकारली होती. मात्र कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता.
शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी नेतृत्वाखाली, शिवसेना सचिव सुधीर साळवी, शिवसेना विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या उपस्थितीत शिवसैनिक बुधवारच्या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसैनिक परळच्या कामगार मैदानांवर जमले, पण आंदोलनावर पोलीसबळाचा वापर करण्यात आला. लोकशाही मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ, दत्ता पोंगडे तसेच इतर शिवसैनिकांनी थेट एफ दक्षिण विभाग कार्यालयात घुसून आंदोलन करून मुंबईकरांच्या पाणी समस्या, महापालिका विभाग अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. तसेच विभाग कार्यालयात घोषणा दिल्या.
वरळी, प्रभादेवीतील शिवसैनिक जी दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यासाठी पांडुरंग बुधकर मार्गावर जमले होते. तेथून थोड्या अंतरावरच मोर्चा अडवला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि सामान्य नागरिक सहभागी झाले. प्रशासनाने पोलिसांना पुढे करून अटकेची व कारवाईची भीती दाखवून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन जी दक्षिण कार्यालयात जाऊन आपले निवेदन दिले. यावेळी आमदार सुनील शिंदे, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर उपस्थित होत्या.
आतापर्यंत आम्ही अनेकदा मोर्चा काढला आहे. पण यावेळी अक्षरश: दडपशाही करीत मोर्चाला विरोध करण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर आदल्या दिवशीपासूनच १६७ च्या नोटीसा बजावल्या. हंडा मोर्चासाठी पोलिसांनी अशा प्रकारे दहशत निर्माण करणे योग्य नाही. मात्र सरकारच्या दडपशाहीला न जुमानता आम्ही विभाग कार्यालयात जाऊन निवेदन दिले, अशी प्रतिक्रिया विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी दिली.