मुंबई : अपुरा व दुषित पाणीपुरवठा, मुंबईकरावर लावण्यात येणारा कचरा कर, रस्त्यांची नित्कृष्ट व अर्धवट राहिलेली कामे अशा विविध प्रश्नांसाठी शिवसेनेने (ठाकरे) या आठवड्यात ठिकठिकाणच्या मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांवर मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र पहिल्याच दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची धरपकड केली. गिरगाव, दादर आणि वडाळा परिसरात शिवसैनिकांना मोर्चा काढूच दिला नाही. राज्य सरकारने पहिल्याच दिवशी आंदोलन मोडून काढले.
मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या आडून राज्य सरकारचा अनागोंदी कारभार सुरू असल्याची टीका करीत शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार या आठवड्यात मुंबईतील २४ विभाग कार्यालयांवर शिवसेनेने (ठाकरे) मोर्चाचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून शिवसेनेच्या (ठाकरे) आंदोलनाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी विभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. तसेच दादर,माहीमचा भाग असलेल्या जी उत्तर विभाग कार्यालयावर आणि वडाळा, नायगावचा भाग असलेल्या एफ उत्तर विभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. तरवरळी, प्रभादेवीतील शिवसैनिक जी दक्षिण कार्यालयावर आणि परळ, शिवडीतील कार्यकर्ते एफ दक्षिण विभाग कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणार आहेत.
मात्र मंगळवारी पहिल्याच दिवशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांना पकडून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. गिरगावमधील ठाकूरद्वार शाखेतर्फे सी विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र शाखेजवळ शिवसैनिक जमताच पोलिसांनी विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह दहा – बारा शिवसैनिकांना पकडून आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेले. गिरगाव शाखेजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस जमले होते. त्यांनी मोर्चा काढू दिला नाही. त्यानंतर उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी काही शिवसैनिकांसह जाऊन मागण्यांचे निवेदन विभाग कार्यालयात दिले. पोलिसांची ही कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी व्यक्त केली. गिरगावातील सगळे रस्ते खोदून ठेवले आहेत, चालायला जागा नाही, पाणीपुरवठा कमी दाबाने होतो, पाणी आले तरी दुषित असते. तरीही आम्ही प्रशासनाला जाब विचारयचा नाही का, असाही सवाल शिंदे यांनी केला आहे.
सेना भवन येथून मंगळवारी जी उत्तर विभाग कार्यालयावरही मोर्चा नेण्यात येणार होता. आमदार महेश सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिकांची येथेही धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यामुळे तिथेही मोर्चा काढता आला नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईत विविध ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांना पाणी टंचाई भेडसावत आहे. तर काही ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होतो आहे. त्याचबरोबर येत्या काळात मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने ठरवले आहे. त्यालाही शिवसेना (ठाकरे) पक्षाने रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रीटिकरणाची कामे सुरू असून खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. असे सगळे मुद्दे या मोर्चाच्या अग्रभागी असतील. गेल्याच आठवड्यात ठाकरे गटाच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.