Aaditya Thackeray : मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर संघटनेने संप पुकारला आहे. त्यामुळे गुरुवारपासून मुंबईत पाणी टँकरची सेवा बंद आहे. पाणी टँकरची सेवा बंद असल्यामुळे अनेक मुंबईकरांना पाण्याच्या समस्यांना समोरं जावं लागत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्या चर्चेत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ५७ टक्केच पगार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबतही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा विविध मुद्यांवरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबईतील पाणी प्रश्नाबाबत पुढील ४८ तासांत योग्य निर्णय सरकारने घेतला नाही तर शिवसेना ठाकरे गट मोठं आंदोलन करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मुंबईत पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर संघटनेचा दोन दिवसांचा संप हा पुढे किती दिवस चालेल माहिती नाही. पण मी आवाहन करतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण असोसिएशनला भेट द्यावी आणि त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांवर तोडगा काढावा. कारण मुंबईत किती दिवस पाण्याचा त्रास सहन करायचा. मुंबईत अनेक ठिकाणी खराब पाणी येतं, मुंबईकरांचे मला देखील अनेक मेसेज येतात. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे, कारण टॅकर असोसिएशने पाणी देणं बंद केलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी नाही”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“दुसरा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा. महायुतीचं सरकार सत्तेत येईपर्यंत असं वाटत होतं की यांच्याकडे खूप पैसा जमा झाला आहे. मात्र, सत्य परिस्थिती अशी आहे की काही दिवसांपूर्वी बीएमसीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर आला नाही. आम्ही त्यासाठी लढा दिला तेव्हा त्यांचा पगार वेळेवर आला. आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर येत नाही. त्यांना फक्त ५७ टक्के पगार दिला जातोय. तुम्ही विचार करा या सरकारला सत्तेत येऊन सहा महिनेही झाले नाहीत तर अशी परिस्थिती आहे. मुंबई महापालिकेकडे राज्य सरकारची जवळपास १६ हजार कोटींची थकबाकी आहे. अशा प्रकराची थकबाकी असतानाही अनेक कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत, एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, उद्या ही वेळ कोणत्याही कर्मचाऱ्यांवर येऊ शकते”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेबाबत दिलेले आश्वासन सरकारने पाळलं नाही. आता हे आश्वासने सोडा कर्मचाऱ्यांनाही अर्धा पगार मिळतोय. मग जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांना जे लोक रस्त्यावर आणत होते, ते लोक आज शांत का आहेत? ते लोक का सरकारला का सवाल विचारत नाहीत? आता मुंबईतील पाण्याच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोण उत्तरे देणार? मुंबईतील पाण्याचा प्रश्न जर पुढच्या ४८ तासांत सुटला नाही तर शिवसेना ठाकरे गट प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.