मुंबई : अपुरा व दूषित पाणीपुरवठा, मुंबईकरावर लावण्यात येणारा कचरा कर, रस्त्यांची नित्कृष्ट व अर्धवट राहिलेली कामे अशा विविध प्रश्नांसाठी शिवसेनेने (ठाकरे) या आठवड्यात मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांवर ठिकठिकाणी मोर्चे आयोजित केले आहेत. गिरगाव, वरळी, परळ, शिवडी या परिसरात मंगळवारी आणि बुधवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली. पावसाळ्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबईत कोट्यवधींचे प्रकल्प चर्चेशिवाय मंजूर झाले. मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवटीच्या आडून राज्य सरकारचा अनागोंदी कारभार करीत असल्याची टीका करीत शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार या आठवड्यात मुंबईतील २४ विभाग कार्यालयावर ठाकरे गटाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गिरगाव, मुंबादेवीचा भाग असलेल्या सी विभाग कार्यालयावर मंगळवारी मोर्चा नेण्यात येणार आहे. तर वरळी, प्रभादेवीतील शिवसैनिक बुधवारी जी दक्षिण कार्यालयावर आणि परळ, शिवडीतील कार्यकर्ते एफ दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत.
मुंबईत गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईत विविध ठिकाणी कमी दाबाने पाणी येत आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांना पाणी टंचाई भेडसावत आहे. तर काही ठिकाणी दुषित पाणीपुरवठा होतो आहे. त्याचबरोबर येत्या काळात मुंबईकरांवर कचरा शुल्क लावण्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने ठरवले आहे. त्यालाही शिवसेनेने (ठाकरे) रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशारा दिला होता. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रीटिकरणाची कामे सुरू असून मोठ्या प्रमाणावर खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
असे सगळे मुद्दे या मोर्चाच्या अग्रभागी असतील. गेल्याच आठवड्यात शिवसेनेच्या (ठाकरे) सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यात या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी वातावरण तापवण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून सुरू आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर पालिकेशी संबंधित विषय ऐरणीवर येऊ लागले आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची २५ वर्षे सत्ता होती. आता मुंबई महापालिकेतील सत्ता मिळण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात चुरस लागली असून शिवसेना (ठाकरे) रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे.