महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएल सामन्याबाबत काही प्रश्नचिन्हे उपस्थित केली असतानाच, आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी एक हजार कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना द्यावेत, अशी थेट मागणी शिवसेनेने केली आहे.
महाराष्ट्रात आयपीएल सामने घेऊ नये अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली. जर हे सामने झालेच तर त्यातून एक हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मिळाले पाहिजेत, असेही खासदार संजय राऊत म्हणाले. आयपीएल सामन्यांवर आतापर्यंत सरकार मेहेरबान होते. त्यामुळेच गेल्या वेळी आयपीएलमधील उत्पन्नाला करमाफी देण्याचे काम सरकारने केले होते. एवढेच नव्हे तर जे पोलीस संरक्षण या सामन्यांसाठी देण्यात आले होते त्यापोटी येणारा खर्चही सरकारने वसूल केलेला नाही. या साऱ्याची माहिती घेऊन सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशाराच राऊत यांनी दिला. आयपीएलचे गॉडफादर असलेले केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे सध्या दुष्काळावर अनेक विधाने करत आहेत. मंत्र्यांना संतर्क राहण्यापासून लोकांना मदत करण्याच्या आवाहनांपर्यंत त्यांची तोंडपाटीलकी सुरु आहे. आता त्यांनी आयपीएलच्या उत्पन्नातून दुष्काळग्रस्तांना मदत करून दाखवावी असे आव्हानच राऊत यांनी दिले. दुष्काळावर काम करणार की आयपीएल सामने घेणार असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना केला होता. आता शिवसेनेनेही आयपीएल सामन्यांना विरोध केला असला तरी सामने होऊच देणार नाही अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतलेली नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने होणार हे निश्चित असले तरी शिवसेनेने केलेल्या मागणीमुळे राष्ट्रवादीपुढे राजकीय अडचण निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
आयपीएलचा पैसा दुष्काळग्रस्तांना द्या
महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएल सामन्याबाबत काही प्रश्नचिन्हे उपस्थित केली असतानाच, आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी एक हजार कोटी रुपये दुष्काळग्रस्तांना द्यावेत, अशी थेट मागणी शिवसेनेने केली आहे.
First published on: 18-03-2013 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena threatens ipl teams to contribute rs 500 cr