मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ‘नकली संघ’ म्हणण्यास कमी करणार नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भाजपवर केली. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी, राज्यातील सर्व ४८ जागा जिंकण्याच्या ईर्षेने ही निवडणूक लढवित असल्याचे सांगितले.
मुस्लीम तुष्टीकरण, मुस्लिमांच्या मतांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली, नकली शिवसेना अशा भाजपकडून सुरू असलेल्या प्रचाराला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी हे राज्यातील दौऱ्यात शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ असे टोमणे मारतात. नकली शिवसेना कोणती हे निकालातून स्पष्ट होईल, असा टोमणा ठाकरे यांनी लगावला. रा. स्व. संघाच्या निष्ठावान कायकर्ते आणि स्वंयसेवकांना भाजपचे सध्याचे धोरण पसंत आहे का, असा सवाल त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण रा. स्व. संघाला साथ देण्याचे आवाहन केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना मुस्लिमांचा अनुनय करते, अशी टीका भाजपचे नेते करतात. मला कधी मुस्लिमांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्याचा अनुभव नाही. पण ‘आपले बालपण मुस्लीम कुटुंबात गेले’, असे मोदीच सांगतात. त्यांच्या ताटात जेवायचे मग त्यांनी गोवंश हत्याबंदी कशी केली, हे माहीत नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला. गेल्या १० वर्षांत काय केले हे सांगण्यासाठी भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर असे मुद्दे उकरून काढण्याची भाजपला सवयच आहे. आमच्यावर ‘व्होट जिहाद’चा आरोप केला जातो. पण भाजपकडून ‘व्होट गद्दार’ केले जाते त्याचे काय, असा सवाल ठाकरे यांनी केला. शिवसेनेला हिंदुत्व शिकविण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोदींना हिंदुहृदयसम्राट व्हायचे आहे. पण हिंदुहृदयसम्राट एकच व ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. जनतेने त्यांना ही पदवी दिली होती. हिंदुहृदयसम्राट होता येत नाही ही तर त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली. त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजप आणि मोदी यांच्यावर आली, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
हेही वाचा >>> “उद्धवजी महाराष्ट्रात आता चालणार नाही तुमचे नखरे, कारण आता आमच्याबरोबर आहेत राज ठाकरे”; रामदास आठवलेंचा टोला!
गद्दारांना दरवाजे बंद
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडून गेलेले काही जण पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात येणार का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘माझ्याबरोबर निष्ठावान राहिलेल्यांवर तो अन्याय ठरेल. काही जण अटकेच्या भीतीने पळून गेले. पण संजय राऊत तुरुंगात गेले. सूरज चव्हाणसारखा आमचा कार्यकर्ता आज तुरुंगात आहे. ते बधले नाहीत. चव्हाण यांना ज्या आरोपावरून अटक झाली त्या कंपनीचा मालक आज शिंदे यांच्याबरोबर उजळमाथ्याने फिरत आहे. त्याच्या विरोधात काही कारवाई नाही. तेव्हा गद्दारांना पक्षाचे दरवाजे बंद झाले आहेत.’
प्रमोद महाजन असते तर!
कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी मोदी यांनी सभा घेतली. पण महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजविण्यासाठी खस्ता खाललेल्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर भाजपची मंडळी देत नाहीत. भाजप नेते प्रमोद महाजन आज हयात असते तर नरेंद्र मोदी यांचा उदयच झाला नसता आणि महाजन हेच पंतप्रधान झाले असते, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. प्रमोद महाजन हे एक वेगळ्या उंचीचे नेते होते. भाजपच्या वाढीत त्यांचे मोठे योगदान होते. दुर्दैवाने याच भाजपने महाजनांची कन्या पुनम महाजन यांना उमेदवारी नाकारली, असे ठाकरे म्हणाले.
●महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजविण्यासाठी खस्ता खाल्लेल्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी का नाकारली?
●गेल्या १० वर्षांत काय केले हे सांगण्यासाठी भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत.