मुंबई : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होत असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. खासदारांनी विषय ठरवून त्यांचा अभ्यास करून संसदेत त्यावर आवाज उठवावा, असे आदेश ठाकरे यांनी दिले. शिंदे गटाकडून खासदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत असल्याने अधिवेशन काळात स्वत: उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार असून तिथे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक पार पडल्यानंतर संसदीय अधिवेशनासाठी पक्षाच्या खासदारांची बैठक ‘मातोश्री’वर घेण्यात आली. या बैठकीला खासदार अरविंद सावंत वगळता सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीत संसद अधिवेशनात शिवसेना (ठाकरे) खासदारांनी कोणकोणते विषय मांडावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संसदेत प्रत्येकाला बोलण्यासाठी पुरेशी संधी मिळेल याची काळजी घेतली जावी, यासाठी समन्वयाचे काम अनिल देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. एकाच व्यक्तीकडून पक्षाची भूमिका मांडली जाण्यापेक्षा सर्व खासदारांना बोलण्याची संधी मिळावी याचे देसाई नियोजन करणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे संसद अधिवेशन काळात दोन दिवसांसाठी दिल्लीत जाणार आहेत. याचीही माहिती बैठकीत देण्यात आली.
मुंबई महापालिकेसाठी रणनीती
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबतही या बैठकीत बोलणी झाली. स्वतंत्र निवडणूक लढायची की आघाडी करायची याबाबत चर्चा झाली नसली तरी महापालिका निवडणूक काळात पक्षाच्या सर्व खासदारांनी मुंबईत यावे आणि मुंबईत राहणाऱ्या आपापल्या भागातील नागरिक, मतदारांशी संपर्क साधून प्रचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी दिली.