Uddhav Thackeray on Badlapur Sexual Assault case: बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेतील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर आता राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये आंदोलन करणारे राजकीय कार्यकर्ते होते, असा आरोप केल्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. तसेच ठाणे जिल्ह्यातच बदलापूर येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुष्कृत्य मान्य आहे का? राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री शिंदे कुठे होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच या विकृतीमध्ये जर मुख्यमंत्री शिंदेंना राजकारण वाटत असेल तर तेही विकृत आहेत. या गुन्ह्यातील आरोपांनी जे पाठीशी घालत आहेत, तेही विकृत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
२४ ऑगस्टच्या बंदमध्ये सामील व्हा
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, अशा विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांना, माता-भगिनींना २४ ऑगस्टच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहे. शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, या वाक्याला काय अर्थ राहिल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्या माता-भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ही भूमिका सर्व राजकीय पक्षांची असली पाहीजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत वर्तमान पत्रात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचून दाखविल्या.
कोलकातामध्ये बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात आगडोंब उसळला. अनेक घटना जेव्हा लागोपाठ घडतात, तेव्हा जनक्षोभाचा उद्रेक होतो. या जनक्षोभात कोणत्याही राजकीय पक्षाचा हात नाही. महाराष्ट्रात अशा विकृतांना कठोर शिक्षा होते, हा संदेश गेला पाहीजे, यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येते. २४ ऑगस्ट रोजी जात-धर्म-पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी झाले पाहीजे, असे त्यांनी आवाहन केले.
मुख्यमंत्री कुठे होते?
चिमुरड्या मुली त्यांच्यावर झालेला अत्याचार सांगू शकत नाहीत. जरी सांगितलं आणि त्यावर व्यवस्था तात्काळ कारवाई करण्यास तयार नसेल तर बदलापूरसारखा उद्रेक होतो. त्यामुळे २४ ऑगस्टच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन विकृतांच्या मनात दहशत बसेल, असा संदेश आपणा सर्वांनी द्यायचा आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी बदलापूरमध्ये आंदोलन होत असताना मुख्यमंत्री कुटे होते? असा प्रश्न उपस्थित केला.
हे ही वाचा >> Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
चिमुकल्या पीडितेच्या गर्भवती आईला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात १२ तास बसवून ठेवले गेले. त्यांना १०२ ताप आला होता. त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. मग ही व्यवस्था कुणाची आहे. बदलापूरमध्ये जनतेचा उद्रेक होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दंग होते. तिथे अर्धा डझन मंत्री आणि गुलाबी जॅकेटवालेही उपस्थित होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला लगावला.