मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी बुधवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मीना कांबळी या रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जातात. बुधवारी रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच बुधवारी उपनेत्या असलेल्या मीना कांबळी यांनीही पक्ष सोडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मीना कांबळी यांचे दक्षिण मुंबईत वर्चस्व होते. तसेच पक्षाने त्यांना दोनदा नगरसेवक पदाची उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडून आल्या नाहीत. त्यानंतर पक्षाने त्यांना उपनेतेपदी नियुक्त केले होते.

हेही वाचा >>>विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणीसाठीही प्रतीक्षाच ; कायदेशीर प्रक्रियासुरू होण्यास अजून किमान तीन आठवडे

गेली अनेक वर्षे त्या या पदावर होत्या. मात्र दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकरिणीचा विस्तार केला. त्यात नवीन नेते, उपनेते, सचिव यांच्या नेमणुका करण्यात आल्या. त्यात कनिष्ठ कार्यकर्त्यांनाही स्थान दिल्यामुळे कांबळी नाराज होत्या असे समजते. मंगळवारपासून त्यांचा दूरध्वनी बंद होता. त्यामुळे ठाकरे गटाला त्याची कुणकुण लागली होती. त्यातच बुधवारी रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठेंभी नाका येथे नवरात्रोत्सवासाठी जाणार होत्या.’महिला पदाधिकारी यावेळी मोठय़ा संख्येने त्यांच्याबरोबर जाणार होत्या. मात्र कांबळी यांच्याशी संपर्क होत नव्हता. याच मुहूर्तावर रश्मी ठाकरे यांना धक्का देण्यासाठी शिंदे गटाने कांबळी यांचा पक्ष प्रवेश केला. वर्षां निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.’यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव, सुवर्णा करंजे आदी उपस्थित होते.