मुंबई : मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रतगती मार्ग राज्य सरकारने मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केले असून पालिका त्यांची डागडुजी व देखभाल करीत आहे. या मार्गावरील पथकर व जाहिरातींचा महसूल रस्ते विकास महामंडळ जमा करीत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मालमत्ता कर व पथकर असा दुहेरी भुर्दंड पडत असल्याने पथकर नाके बंद करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग गेल्या वर्षी मुंबई महापालिकेला हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गाची देखभाल व दुरुस्ती सध्या पालिका करीत आहे. मात्र या मार्गावरील पथकर व विद्युत जाहिरात फलकांमधून (साईन बोर्ड) मिळणारा महसूल रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत जात आहे. देखभाल पालिका करणार आणि महसूल रस्ते विकास महामंडळ घेणार, हे कशासाठी, असा सवाल ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. रस्ते महामंडळ हा विभाग गेली सात-आठ वर्षे कोणाकडे आहे, हे सर्वाना माहीत आहे. त्यामागे कंत्राटदार मित्रांचे हित जपले गेले आहे. मुंबई पालिकेने रस्ते विकास महामंडळाला दोन हजार कोटी रुपये का दिले, हे गुलदस्तात असल्याचे ठाकरे म्हणाले.
रस्ते बांधणीत झालेल्या भ्रष्टाचारात दोषी अधिकाऱ्यांवर आमचे सरकार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. घटना बाह्य खोके सरकारची हिंमत असेल, तर हा निर्णय घ्यावा. सरकारने पथकर वसुली बंद न केल्यास आमचे सरकार सत्तेवर आल्यावर ते बंद केले जातील. मात्र त्यासाठी आंदोलन करुन जनतेला त्रास मात्र देणार नाही. – आदित्य ठाकरे</strong>