मुंबई : शिवसैनिक सामान्य असला तरी त्याची ताकद असामान्य आहे. शिवसेनेने ज्यांना शेंदूर लावून मोठे केले ते आज शिवसेना गिळायला निघाले आहेत. त्यांना भाजपची साथ आहे. मुंबई व महाराष्ट्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी मराठी माणूस व शिवसेनेला संपवण्याचा हा डाव असून ठाकरे-शिवसेना व मराठी माणूस हे नाते त्यांना संपवायचे असले तरी त्यांना ते शक्य होणार नाही, असा निर्धार व्यक्त करत न्यायालयीन लढाईसाठी प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने शपथपत्राची भेट द्यावी, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर पुढच्या महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शिवसेना नेते या वेळी उपस्थित होते. गेले बरेच दिवस अरविंद सावंत मला कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बोलवत होते; पण मी दुर्लक्ष करत होतो. पण आता दुर्लक्ष करून चालणार नाही. आमदार-खासदार म्हणतात ते ऐकावे लागते असे हल्ली दिवस आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपला ठाकरे आणि शिवसेना हे नाते संपवायचे आहे. यापूर्वी अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला; पण आता शिवसेना संपवण्याचा डाव आखण्यात आला आहे. गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे अनेक घटनातज्ज्ञ सांगतात. कालच त्यांना एका पक्षाने प्रस्ताव दिला आहे, असा चिमटाही मनसेचे नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कितीही वादळे आली तरी शिवसेनेची पाळेमुळे घट्ट आहेत. आता शिवसेना कोणाची याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगात होणार असे म्हणतात. शिवसेना कोणाची हे मराठी माणसाला माहिती असले तरी न्यायालयीन लढाईसाठी गटप्रमुखापासून ते सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे मला हवी आहेत. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती शपथपत्रे आणि नवीन सदस्य नोंदणीचे अर्ज हीच भेट द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच शिवसेनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खासगी संस्था नेमून पैसा खर्च करून अर्ज भरून घेतले जात आहेत. आता सत्ता, पैसा आणि निष्ठा यांची लढाई आपल्याला लढायची आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात युती होत असताना सर्व समसमान असे ठरले होते; पण त्यानंतर जागा तर कमी दिल्याच; पण मुख्यमंत्रीपदाबाबत जे ठरले होते, त्याबाबत नाही म्हणाले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष आमदारांना साथ देत शिवसेनेच्या जागा पाडल्या. अडीच-अडीच र्वष सत्ता द्या म्हटले होते. तेव्हा नाही म्हणाले. मग आता कसे जमले, असा सवाल करत हे आधीच झाले असते, तर सन्मानाने झाले असते. मनावर दगड ठेवून करायची गरज नव्हती. तुमच्याही कुठल्या तरी दगडाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाचा शेंदूर लागला असता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Story img Loader