तिळगुळाच्या गोडव्याऐवजी शिमग्याची तयारी; दोन्ही बाजूंची मोर्चेबांधणी
शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेवर ‘संक्रांत’ आल्याने ती आता रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र संक्रांतीला तिळगुळाच्या गोडव्याऐवजी उभयपक्षी ‘शिमगा’ करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेवर हल्ला करून ‘लक्ष्यभेद’ करण्याची तयारी भाजपने चालविली आहे. तर महापालिकेतील गड उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी शिवसेनेकडूनही तटबंदी करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांची कडक हजेरी घेऊन त्यांना निवडणुकीची जबाबदारी दिली आहे.
स्वबळाचे हाकारे देत भाजप व शिवसेनेकडून युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला खरा, पण चर्चेला मुहूर्तच मिळाला नाही.
शिवसेनेचे मंत्र्यांना निर्देश
ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून कडक हजेरी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या मंत्र्यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यभरात दौरे करून प्रचार केला व त्यांना चांगले यश मिळाले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मात्र फारसे लक्ष दिले नव्हते. आता महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मंत्र्यांनी राज्यभरात दौरे करून ग्रामीण भागही पिंजून काढावा आणि शिवसेनेला यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी या निवडणुकांमध्ये लक्ष घातले असून राज्यातील काही भागात त्यांचे दौरेही होतील.
भाजपनेही शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ालाच अग्रक्रम दिला आहे. पारदर्शी कारभारासाठी जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी जनतेकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेविरोधात पालिकेतील भ्रष्टाचार हेच महत्त्वाचे अस्त्र भाजप वापरणार आहे.
- युतीच्या चर्चेआड ‘संक्रांत’ आल्याने आता रविवारचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
- शिवसेनेकडून सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत तर भाजपकडून प्रकाश मेहता, विनोद तावडे व आशीष शेलार हे नेते युतीसाठी बोलणी करणार आहेत.