जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे प्रतिपादन करीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली, तरच या प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले. कोकणाच्या विकासासाठी पर्यावरणविषयक र्निबध लादले जाऊ नयेत, असेही मत त्यांनी व्यक्त  केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणुऊर्जा प्रकल्पांवर भर देण्याचे धोरण ठरविल्याने भाजप हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी पावले टाकत असताना सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे त्यात अडथळे निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
पर्यावरणमंत्री कदम यांनी सुयोग विश्रामभवनात पत्रकारांशी बोलताना पर्यावरणाच्या विविध विषयांबरोबर अनेक विषयांवर भाष्य केले. शिवसेना सत्तेत सहभागी झाल्याने जैतापूर प्रकल्पाबाबतच्या शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला आहे का, असे विचारता त्यांनी पक्षाची भूमिका कायम असल्याचे सांगितले. आम्हाला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, स्मशानभूमी करायची नाही, आम्ही कोकणचा कोळसा होऊ देणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. देशात अनेक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाले असताना तेथे प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत. ते केले तरी आपल्याकडे पुरेशी वीज उपलब्ध होईल व या प्रकल्पाची गरज नाही. कोकणाच्या विकासासाठी पर्यटन आणि फलोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. किनारपट्टी रस्त्याचे कामही मार्गी लावले जाईल, असे कदम यांनी सांगितले. लवासा प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्या घेतल्या गेल्या नसल्यास तपासून पाहिले जाईल, शीळ फाटय़ाजवळच्या दगडखाणीही परवानगी घेऊन सुरू आहेत का, याची माहिती घेतली जाईल आणि मिठी नदीतील प्रदूषण रोखून ती मोकळी केली जाईल, असे कदम यांनी यासंदर्भातील प्रश्नांवर सांगितले.

गुजरातचा एकही टँकर येऊ देणार नाही
गुजरातमधून आलेल्या टँकरमधून अंबरनाथजवळ रसायन सोडण्यात आले व त्याचा अनेकांना प्रचंड त्रास झाला. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत. गुजरातमधून टँकर येऊन असे रसायन सोडले गेले, तर तो टँकर परत जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.

सर्व विषयांवर बोलणार
शिवसेनेच्या मंत्र्यांकडे दुय्यम स्वरूपाची खाती असून त्यांनी जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती कशी पूर्ण करणार, असे विचारता कदम म्हणाले, शिवसेनेकडच्या खात्यांचा प्रश्न नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व खात्यांबाबत बोलता येईल. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक ती पावले टाकली जातील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेयांनी विविध विषयांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार केली आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितपणे पावले टाकली जातील.

Story img Loader