कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक गणेश साळवी यांना गळाला लावत शिवसेनेने शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर एकतर्फी विजय संपादन केला. शिवसेना पुरस्कृत बसपाचे नगरसेवक विलास कांबळे यांनी गेल्या वर्षी झालेल्या पराभवाची परतफेड करत सभापतीपदावर बिनविरोध विजय मिळविला. काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत अगदी काल-परवापर्यंत दबाबतंत्राचे राजकारण करणारे भाजपचे नगरसेवक संजय वाघुले तसेच पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याने राष्ट्रवादी प्रणित आघाडीचे उमेदवार संजय भोईर यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.  
ठाणे महापालिकेचे महापौरपद शिवसेनेच्या ताब्यात असले तरी, स्थायी समिती मात्र काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत स्थायी समितीच्या चाव्या ताब्यात घेण्याचा चंग बांधत सत्ताधारी शिवसेनेने संख्याबळाची जुळवाजुळव सुरू केली होती. महापौर-उपमहापौर निवडणुकीत महायुतीला मदत करणारे बसपाचे नगरसेवक विलास कांबळे यांना शिवसेनेने सभापतीपदाची उमेदवारी देऊ केली होती, पण महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनीही सभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्याने सत्ताधारी शिवसेनेला घाम फुटला होता. तसेच निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासून वाघुले ‘नॉट रिचेबल’ होते. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेचे नेते अधिक संतापले होते. राष्ट्रवादी प्रणित आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण पक्षाच्या आदेशामुळे त्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिल्याने अखेर राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत मनसे तटस्थ राहील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. असे झाल्यास महायुती तसेच आघाडीचे संख्याबळ समसमान होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतीपदाची निवड होईल, अशीही चर्चा होती. दरम्यान, निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच स्थायी समितीचे सदस्य गणेश साळवी यांना गळाला लावत शिवसेनेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना जबरदस्त धक्का दिला. गणेश साळवी यांनी थेट महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्याने राष्ट्रवादी प्रणित आघाडीचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार संजय भोईर यांचा पराभव निश्चित मानला जात होता. त्यामुळेच भोईर यांनी शुक्रवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच भाजपचे वाघुले यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. गणेश साळवी यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला शिवसेनेपुढे ही नमती भूमिका घ्यावी लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा