मुंबई : मुंबईची जीवनवहिनी असलेला बेस्ट उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर असून बेस्टच्या दुर्दशेबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकदाही चर्चा झाली नाही. त्याबद्दल बेस्टमधील कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामगार सेनेने सर्व आमदार व मंत्र्यांना बेस्टच्या दुरावस्थेबद्दल पत्र पाठवले होते. मात्र बेस्टचा विषय एकदाही चर्चेला आला नाही.
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाची (बेस्ट) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. बसगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे परिवहन सेवेवरही परिणाम झाला आहे. कंत्राटावरील बसगाड्यांच्या अपघातांची संख्याही वाढत आहे. विद्युतपुरवठा विभागातही काही आलबेल नाही. बेस्टला कामगारांचे दरमहा पगार देण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. दिवसेंदिवस बेस्टच्या स्वमालकीच्या बसगाड्या कमी होत आहेत. भविष्यात बेस्ट टिकेल की नाही याची शाश्वती उरलेली नाही.
खासगी कंत्राटदाराो बसचालक व वाहक वारंवार संपावर जात आहेत, त्यांच्याकडून अपघात होत आहेत. त्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. बेस्टमध्ये कोणीही अधिकारी महाव्यवस्थापक म्हणून काम करायला तयार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या या दुर्दशेबाबत बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सर्व मंत्री व आमदार यांना पत्र पाठवून कळवले आहे. मात्र अधिवेशन संपत आले तरी बेस्टबाबत एकदाही चर्चा झालेली नाही याबाबत कामगार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर
कुर्ला येथे बेस्ट बसचा ९ डिसेंबर २०२३ रोजी रात्री भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे एकूण दहा जणांना प्राण गमवावे लागले, तर ४० हून अधिक जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर बेस्टच्या दुरावस्थेचा विषय चव्हाट्यावर आला. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
निवृत्तीमुळे कर्मचाऱ्यांचा तुटवडा
बेस्ट उपक्रमात विद्युतपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग निवृत्त होत आहे. बेस्टच्या विद्युतपुरवठा विभागात देयकांचे पैसे घ्यायला कर्मचारी नाहीत. कर्मचारी कमी झाल्याने बेस्टची वीज बिल भरणा केंद्र बेस्टने बंद केली आहेत. विद्युत नियामक आयोगाच्या नियमानुसार विद्युतपुरवठा विभागात नवीन भरती करता येते. मात्र भरतीही केली जात नाही. अशा सगळ्या विषयांचा कामगार सेनेने आमदार व मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात उल्लेख केला आहे.
विविध मागण्यांचे गाऱ्हाणे
बेस्टचे खासगीकरण थांबवा, बेस्टमध्ये स्वमालकीच्या गाड्या खरेदी करा,कंत्राटी बस सेवा रद्द करा, कामगारांची भरती करा, सेवानिवृत्त कामगारांची देणी तत्काळ द्यावी, अशा विविध मागण्या कामगार सेनेने केल्या आहेत. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने आर्थिक साहाय्य करावे अशीही मागणी कामगार सेनेने केली आहे.