शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबरला द्वितीय स्मृतीदिन असल्याने शिवाजी पार्कवर मोठय़ा संख्येने शिवसेना कार्यकर्ते जमणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेतेही स्मृतीस्थळी जाऊन आदरांजली वाहण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुखांचे निधन होऊन दोन वर्षे होत असून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुका, भाजपशी तुटलेली युती आणि ताणले गेलेले संबंध या पाश्र्वभूमीवर ठिकठिकाणचे शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सकाळी नऊपासूनच तेथे हजर राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर स्मारक आणि शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ येथे जाऊन आदरांजली वाहिली होती. त्यामुळे शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करणार असली तरी त्याचा वैयक्तिक संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजपने शिवसेनाप्रमुखांना मार्गदर्शक व आधारस्तंभच मानले. त्यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या जाहीर सभांमध्येही आदर व्यक्त केला. त्यामुळे फडणवीसही स्मृतीस्थळी जाऊन शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहतील, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader