भरावाने भरती-ओहोटीच्या प्रवाहांवर परिणाम होण्याची धास्ती; राजभवन, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंटची हानी?
एकीकडे पर्यावरणवादी व मच्छीमारांचा नरिमन पॉइंट येथील प्रस्तावित शिवस्मारकाला विरोध सुरू असून दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी भाजप सरकार उतावीळ झाल्याचे दिसते आहे. मात्र, समुद्रात जवळपास १५.९६ हेक्टरवर पसरलेल्या खडकाळ भागावर हे स्मारक उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भराव टाकण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम समुद्रातील भरती-ओहोटीच्या प्रवाहांवर होण्याची शक्यता असून यामुळे स्मारकानजीकच्या किनारपट्टीवरील वाळूची धूप, तसेच पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची भीती सागरी अभ्यासक व्यक्त करत आहेत. याचा फटका राजभवन, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट, हाजीअली यांना बसण्याचीही शक्यता आहे.
येत्या २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या शिवस्मारकाच्या नरिमन पॉइंटजवळील समुद्रातील प्रस्तावित जागेला मच्छीमार व पर्यावरणवादी यांनी विरोध करत त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात धाव घेतली असून याबाबतची सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे. मात्र आता या शिवस्मारकाबाबत सागरी अभ्यासकांनी नवा मुद्दा उपस्थित केला असून हे स्मारक झाल्यास भविष्यात मुंबईच्या सागरी किनारपट्टीची धूप होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. स्मारक उभारण्यासाठी १५.९६ हेक्टरवर पसरलेल्या एका खडकावर स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी एवढय़ाच परिसरात भराव टाकून जागा निर्माण करावी लागणार असून खडकापासून ८ मीटर उंचीपर्यंत हा भराव असणार आहे. आधीच नरिमन पॉइंट, मरिीन ड्राइव्ह येथे समुद्रात भराव टाकून जमीन निर्माण करण्यात आल्याने पुन्हा एकदा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात समुद्राला अडवून जमीन करण्याचा प्रयत्न होणार असल्याने त्याचा परिणाम सागरी प्रवाहांवर होणार आहे. ज्यामुळे नजीकच्या किनारपट्टीची एक तर धूप अन्यथा पाण्याच्या पातळीत वाढ हे प्रकार होणार आहेत.
प्रवाहांच्या दिशेत बदल
याबाबत बोलताना ज्येष्ठ सागरी अभ्यासक डॉ. विनय देशमुख म्हणाले की, समुद्रात विशिष्ट प्रकारचे प्रवाह असतात. यातील भरती-ओहोटीमुळे निर्माण होणारे प्रवाहदेखील असतात. त्यामुळे समुद्रात जर या प्रवाहांच्यामध्ये भराव अथवा तो अडवला गेल्यास या प्रवाहांच्या दिशेत बदल होतो. कारण, भरती-ओहोटी सुरू झाल्यावर निर्माण झालेल्या लाटा या २५ किलोमीटरचा परिसर प्रभावित करत असतात. यात असा भराव आल्यास सागरी प्रवाह दिशा बदलतात. प्रवाह बदलल्याने अनेक बदल होतात. यापूर्वी नरिमन पॉइंटच्या निर्मितीवेळी भराव टाकण्यात आल्यानंतर प्रवाह बदलल्याने वर्सोवा येथील किनारपट्टीची धूप झाली होती. या वेळी किनाऱ्यावरील वाळू वाहून गेल्याने तेथे खडक दिसू लागले. तसेच, त्यानंतर वांद्रे-वरळी सागरी सेतूसाठी वांद्रे येथे या सेतूच्या कामासाठी भराव घालून मैदान तयार करण्यात आले होते. यामुळे मात्र, प्रवाहांमध्ये बदल होऊन दादर चौपाटी येथील किनाऱ्याची धूप झाली असून याच्या झळा महापौर बंगल्याला बसल्याने बंगल्याचा पाया ढासळला होता. दरम्यान, स्मारकाची जबाबदारी पाहणारे अतिरिक्त सचिव भगवान सहाय यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कशावर परिणाम?
एरव्ही पावसामुळे राजभवन व मरिन ड्राइव्ह येथे मोठय़ा लाटा आदळतात. यात अधिक वाढ होऊन त्या जास्त आत येण्याची शक्यता असून राजभवन, हाजी अली, गिरगाव चौपाटी येथे वाळूची धूप किंवा पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकेल. तसेच, हाजीअलीचा प्रवेशमार्गदेखील कायमचा बंद होण्याची शक्यता असून राजभवनचा आतील किनारादेखील पाण्याखाली जाऊ शकेल असा कयास देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे परिणाम येत्या दोन वर्षांत दिसून येतील असेही ते म्हणाले.
खडक नव्हे, प्रवाळ बेट
शिवस्मारकाची प्रस्तावित जागा ही समुद्रातून वर आलेल्या खडकाचा भाग असून ओहोटीवेळी हा खडक दिसतो. मात्र भरतीवेळी पाण्याखाली जातो. त्यामुळे यावर प्रवाळांचे मोठे अस्तित्व असून ते संरक्षित प्रजातींपैकी आहेत. त्यामुळे त्यावर बांधकाम केल्यास ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट’ या कायद्याचा भंग होणार आहे.