मुंबई: शिवडी मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खूप दिवस आधीच बाळा नांदगावकर यांचे नाव जाहीर केले होते. तेव्हापासून संपूर्ण मतदार संघात आपली शिवडी आपला बाळा अशी घोषवाक्ये असलेले फलक जागोजागी मनसेने लावले आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दहा वर्ष कुठे लपलेला बाळा असा प्रश्न विचारणारी मोहीम शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवरून सुरू केली आहे.

शिवडी या मतदारसंघाकडे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुमारे महिनाभर आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळा नांदगावकर यांचे नाव जाहीर केले आहे. बाळा नांदगावकर हे २००९ मध्ये या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांचा पराजय करून ते विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ पासून सलग दोनदा अजय चौधरी निवडून आले आहेत. आता पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे) पक्षासमोर नांदगावकर यांचे आव्हान आहे. ठाकरे पक्षाने अद्याप या मतदार संघासाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदगावकर यांच्या विरोधात समाज माध्यमावरून मोहीम चालवली आहे. आपली शिवडी आपला बाळा या वाक्याला दहा वर्ष कुठे लपलेला बाळा या वाक्याने प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा

सांग सांग बाळा तू राहतोस कुठे, किंवा करोनामध्ये कुठे होता आपला बाळा असे असे प्रश्नार्थक संदेश समाज माध्यमांवरून प्रसारित केले जात आहेत. बाळा यांच्याविरोधातील या मोहीमेने शिवसेना शाखा क्रमांक २०४ मधून मोठ्या प्रमाणावर जोर धरला आहे. या मजकूरावर दोन्ही बाजूने कार्यकर्ते व्यक्त होत आहेत. गेली दहा वर्षे नांदगावकर हे मतदार संघात फिरकलेही नाहीत अशी टीका कोणी केली आहे. तर व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी नांदगावकर हेच पहिले रस्त्यावर उतरले होते, असे प्रत्युत्तर नांदगावकर यांच्या समर्थकांनी दिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूकीची लढाई सुरू होण्याआधी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील वाकयुद्ध समाजमाध्यमांवर गाजत आहे.