मुंबई : शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) बालेकिल्ला असलेला शिवडी विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चुरशीमुळे धुमसत आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी आणि लोकसभा निवडणूक समन्वयक सुधार साळवी हे दोघेही या मतदारसंघासाठी इच्छुक असून पक्षश्रेष्ठींनी हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही दोन्ही इच्छुकांनीही माघार घेतलेली नाही. त्यामुळे ‘मातोश्री’ आता यातून कसा मार्ग काढणार याकडे शिवडीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शहर भागातील शिवडी हा शिवसेना (ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या मतदारसंघात दोन प्रबळ उमेदवारांमध्ये चुरस आहे. हा तिढा सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केला. दोन्ही उमेदवारांना ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोन्ही उमेदवारांनी आपला दावा सोडलेला नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे अखेर उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातील शाखाप्रमुखांचे मत विचारात घेण्याचे ठरवले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही खास शैली ठाकरे यांनी यावेळी अंमलात आणली आहे. बुधवारपर्यंत या जागेबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-काजीपेट विशेष रेल्वेसेवा
शिवडी मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी हे आतापर्यंत दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर अनेक आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली. मात्र चौधरी हे ठाकरे यांच्यासोबतच राहिले. ही त्यांची जमेची बाजू आहे. तर याच मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार असलेले सुधीर साळवी हे लालबागचा राजा मंडळाशी गेली अनेक वर्षे जोडलेले आहेत. साळवी यांच्यावर लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने लोकसभा समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली होती. जुन्या शिवसैनिकांमध्ये चौधरींना पसंती आहे. तर तरुण कार्यकर्त्यांमध्ये साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेची शकले पडल्यानंतर ज्यांनी पक्ष सोडला नाही त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. मात्र या मतदारसंघासाठी हे सूत्र लागू होईलच असे नाही. साळवी यांनीही गेली अनेक वर्षे पक्षात काम केले असून त्यांनाही यावेळी उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यातच या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली असून चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे पक्षाला हा तिढा अत्यंत नाजूकपणे सोडवावा लागणार आहे.