महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचे चरित्र ‘प्रभो शिवाजी राजा’ या अ‍ॅनिमेशनपटाच्या माध्यमातून लवकरच जगासमोर येणार आहे.
इन्फिनिटी व्हिज्युअल आणि मेफॅक या कंपन्यांनी हा अ‍ॅनिमेशनपट तयार केला असून येत्या उन्हाळ्यात संपूर्ण भारतात आणि भारताबाहेरही तो प्रदर्शित होणार आहे.
मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये तो बनवण्यात आला आहे. मराठीत महाराजांसाठी अभिनेता उमेश कामत याने आवाज दिला असून हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही जबाबदारी धमेंद्र गोविल यांनी पार पाडली असल्याचे अ‍ॅनिमेशनपटाचे दिग्दर्शक नीलेश मुळे यांनी सांगितले.
१०० मिनिटांच्या या अ‍ॅनिमेशनपटासाठी नीलेश मुळे आणि त्यांची टीम तब्बल चार वर्षे संशोधन करत होती. चित्रपटाची कथा आणि पटकथा निनाद बेडेकर यांनी लिहिली असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचेही मार्गदर्शन या कामात लाभले. अ‍ॅनिमेशनपटातील शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी शिवकाळात महाराष्ट्राला भेट देणाऱ्या एका डच कलावंताने काढलेल्या महाराजांच्या चित्राचा आधार घेण्यात आला आहे. शहाजी राजे, जिजामाता, औरंगझेब, मिर्झा राजे जयसिंग यांच्या व्यक्तिरेखांसाठी अनुक्रमे अभिनेते अविनाश नारकर, उज्ज्वला जोग, जयंत घाटे आणि उदय सबनीस यांचे आवाज वापरण्यात आले आहेत. निवेदनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर यांनी पार पाडली आहे.

Story img Loader