छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट ‘शिवशाहीर’ बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेकदा सांगितला आहे. त्यांच्या त्या कथनाचं मराठी पुस्तक हे मराठीतल्या सर्वाधिक मागणी असलेल्या पुस्तकांपैकी आहेच, शिवाय त्याचं इंग्रजी भाषांतरही झालं आहे. दीनानाथ दलाल यांच्या रेखाचित्रांनी ते पुस्तक सजलं आहे. याच बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच ‘शिवापट्टण संस्कार केंद्र’ या एका स्वप्नाच्या पूर्तीसाठी ‘दुर्ग फाऊंडेशन’च्या वतीने श्रीकांत चौगुले व गौतम चौगुले यांच्या १०० हून अधिक चित्रांचं प्रदर्शन तयार झालं आहे.

जेव्हा केव्हा ‘दुर्ग फाऊंडेशन’चा ‘शिवापट्टण संस्कार केंद्रा’चा प्रकल्प संपूर्ण साकार होईल, तेव्हा त्यामध्ये ही सर्व चित्रं कायमस्वरूपी मांडलेली असतील आणि मग तिथे, छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या अनेक गोष्टी लोकांना कळाव्यात यासाठी या चित्रांचा दैनंदिन वापर होऊ लागेल.

पण तसा अपेक्षित उपयोग सुरू होण्याच्या आधी, येत्या सोमवापर्यंत (२० जून) ही चित्रं आपल्या ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त मांडली गेली आहेत. या कलादालनाच्या लेखी ते ‘एक चित्रप्रदर्शन’ आहे. या प्रदर्शनानं ‘जहांगीर’च्या तळमजल्यावरची सर्वच्या सर्व- चारही दालनं व्यापली असली, तरीही ते ‘जहांगीर’साठी काही अभिमानाचा वगैरे विषय नाही. तेही साहजिकच आहे. उद्या कोलकात्यातल्या एखाद्या डाव्या चित्रकारानं श्रमिकांचे किंवा सर्वहारांचे हाल दाखवणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन मांडून डाव्या राजकारणाला गती मिळावी अशी अपेक्षा केली तरी ‘जहांगीर आर्ट गॅलरी’चा जसा डाव्या राजकारणाला पाठिंबा असणार नाही, तसंच हेही. शिवाय राज्य कला प्रदर्शन, बॉम्बे आर्ट सोसायटीचं वार्षिक प्रदर्शन ही स्पर्धावजा प्रदर्शनं आजवर अगदी दरवर्षी अशीच- चारही दालनांत भरवली जात किंवा हर्ष गोएंकांसारख्या चित्रसंग्राहकांनीही कुठल्याशा ‘फाऊंडेशन’मार्फत आपल्या ताब्यातल्या कलाकृतींचं प्रदर्शन ‘जहांगीर’च्या चारही दालनांत मांडण्याची युक्ती अनेकदा चालवली होती. तरीसुद्धा या प्रदर्शनाचं कौतुकच- याचं कारण ते छत्रपती शिवराय या एकाच विषयाला वाहिलेल्या आणि दोनच चित्रकारांच्या चित्रांचं आहे म्हणूनच केवळ नव्हे, तर ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे प्रमुख आश्रयदाते (चीफ पेट्रन) असूनही या संस्थेच्या प्रदर्शनाला फक्त पंतप्रधान आले म्हणूनच येणारे राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयातर्फे भरवल्या जाणाऱ्या ‘राज्य कला प्रदर्शना’कडे न फिरकणारे मुख्यमंत्री, या दोघा घटनात्मक पदाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनानिमित्तानं ‘जहांगीर’मध्ये पायधूळ झाडली, म्हणूनही. सर्वच इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांनी हे प्रदर्शन भरणार/ भरलं असल्याच्या बातम्या दिल्या असल्यामुळे, या प्रदर्शनाच्या प्रसिद्धीचं काम अगदी दोनशे टक्के यशस्वी झालं आहे- आणि हे सारं मराठी भाषकांनी केलं आहे- हासुद्धा अभिमानाचाच विषय होय.

आता प्रसिद्धी वगैरेच्या पलीकडे- चित्रप्रदर्शनाकडे कोणताही चित्रकलाविषयक स्तंभ जसा पाहातो, तसं पाहिल्यास काय दिसतं?

ही सर्व चित्रं, कोणत्या तरी विषयाचं किंवा गोष्टीचं बोधचित्र (इलस्ट्रेशन) म्हणून काढल्यासारखी आहेत. काही चित्रांतून व्यक्तींच्या चेहऱ्यांवर भावदर्शन चांगलं आहे, पण ते वगळता चित्रातून अभिव्यक्ती करण्यासाठीचा स्वतंत्र विचार चित्रकारांनी केलेला नाही. राज्याभिषेकाच्या चित्रांमध्ये ‘सात नद्यांच्या पाण्याने अभिषेक’ किंवा ‘सुवर्णतुला’ ही चित्रं आपणा सर्वाना पूर्वापार (इयत्ता चौथीसाठीचं जुनं ‘राजा शिवछत्रपती’ हे पाठय़पुस्तक, पुरंदरे यांच्या पुस्तकातली दलालांची चित्रं) माहीत असलेलीच आहेत. अन्य चित्रांमध्ये प्रतापराव गुजर यांची लढाई हे एक चित्र वीररसपूर्ण असलं, तरी त्याच्या शेजारचं- गुजर यांच्या मुलीशी संभाजीराजेंचा विवाह- हे चित्र केवळ ‘चरित्र-वर्णनासाठी उपयुक्त’ एवढंच आहे. त्या चित्रातून शिवकालीन विवाह सोहळय़ाचं दर्शन झालं म्हणावं, तर राज्याभिषेकापूर्वी पद्धत म्हणून करावा लागणाऱ्या विवाह सोहळय़ाची दोन चित्रं दुसऱ्या दालनात आहेतच! चित्रांच्या विषय-निवडीवर दिसणारी बाबासाहेब पुरंदरे यांची छाप राज्याभिषेकाला भरपूर महत्त्व मिळाल्यामुळे दिसतेच, पण गागाभट्ट, हिरोजी र्फजद, लाया पाटील, हिरकणी या पुरंदरे यांच्या कथनातून अजरामर झालेल्या गोष्टींची चित्रं त्या कथनाबरहुकूमच असल्यामुळेही दिसते. ‘रायगडाचं बांधकाम’ या विषयावरली तीन चित्रं इथं असली; तरीसुद्धा एकाही चित्रातून, गडाच्या बांधणीतला एखादा आव्हानात्मक टप्पा (उदाहरणार्थ ‘चित् दरवाजा’च्या कमानीचा सर्वात वरचा दगड- कीस्टोन- बसवणं) कसा पूर्ण केला, याचं दर्शन होत नाही. ‘रायगडावरली बाजारपेठ’सारखी, शिवकालीन लोकजीवनाची चित्रं अधिक असती तर बरं झालं असतं. मात्र या विषयांच्या पलीकडलं कामही आहे- ते पाश्चात्त्य चित्रपद्धतीत ज्याला ‘लँडस्केप’ म्हटलं जातं, तसं- निसर्गदृश्यांचं- काम आहे. किल्ले, त्या किल्ल्यांना धारण करणारे डोंगर हे सारं शिवकाळात जसं असेल तसंच चित्रात दाखवण्याचा प्रयत्न चौगुले यांनी केला आहे. उदाहरणार्थ, ‘राजगड-रायगड’ या चित्रात मधल्या डोंगरांचं रूप हे आजच्या ‘रीअल इस्टेट’विना, अनाघ्रात आणि मावळ प्रांतातल्या जुन्या वस्त्या असलेलं असंच आहे किंवा या भागातल्या नद्या खळाळून वाहात आहेत. भूगोलाचा इतिहास सांगणारी ही चित्रं रंजक आहेत.

प्रसंगचित्रांमध्ये भरपूर मानवाकृती असूनसुद्धा त्यापैकी काही मानवाकृतींनाच कसं महत्त्व द्यावं, प्रकाशाचा खेळ खुबीनं करून विषयातल्या महत्त्वाच्या भागाकडेच प्रेक्षकांचं लक्ष कसं वेधावं, चित्रचौकटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्वत्र रंगनाटय़ कसं खेळत राहावं ही विख्यात दिवंगत चित्रकार एस. एम. पंडित यांची वैशिष्टय़ं ज्या ‘जहांगीर’च्या तीन प्रदर्शन-दालनांत गेल्या मंगळवापर्यंत (१४ जून) दिसली होती; तिथेच ‘पंडित यांचे शिष्य’ म्हणवणाऱ्या चौगुले पिता-पुत्रांची चित्रं पाहाताना नकळत तुलना होते आणि ‘या चित्रांत ती वैशिष्टय़ं नाहीत’ अशी कबुली (दोन्ही प्रदर्शनांच्या) प्रेक्षकाकडून येते, तेव्हाच ‘ही चित्रं काहीशी जुन्या उत्तम आणि अव्वल फिल्म पोस्टरसारखी का दिसतात?’ याही प्रश्नाचं उत्तर नकळत मिळून जातं.

चित्रप्रदर्शन म्हणून याकडे पाहणारे थोडके लोक भले कितीही निराश होवोत.. तरीसुद्धा प्रदर्शनाचं कौतुक आणि स्तुती करायलाच हवी- चित्रप्रदर्शन म्हणून नव्हे, तर मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या अभिमानबिंदूचं प्रदर्शन कधी नव्हे ते ‘जहांगीर’सारख्या मोक्याच्या कलादालनात भरलं आहे, म्हणून!

Story img Loader