महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील  अश्वारूढ पुतळा अंधारात ठेवण्याचा चमत्कार महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने ‘करून दाखवला’आहे. या पुतळ्यासमोरच महापौरांचा बंगला असला तरीही महाराजांच्या पुतळा अंधारात असल्याच्या या गोष्टीकडे लक्ष द्यायला महापौर किंवा स्मारक समितीला वेळ झालेला नाही.
शिवसेनेचा जन्म झाला त्याच वर्षी म्हणजे १९६६ मध्ये शिवाजी पार्क येथे हा भव्य पुतळा उभारण्यात आला.  पुतळ्याच्या देखभालीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती’ही स्थापन करण्यात आली. पण, महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ मात्र अंधारात बुडून गेला आहे.
शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची मागणी करणाऱ्यांनी आणि शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या स्मारकरुपी पुतळ्यांची देखभाल व्यवस्थित केली तर तीच शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया ‘श्री राजा शिव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष मोहन सरक यांनी ‘लोकसत्ता’कडे नोंदविली.
समिती अध्यक्ष आणि महापौरांची टोलवाटोलवी
याबाबत स्मारक समितीचे अध्यक्ष मनमोहनसिंग बेदी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या पुतळ्याच्या देखभालीची सर्व जबाबदारी महानगरपालिकेची असल्याचे सांगितले. यावर तुम्ही पालिकेकडे यासाठी   पाठपुरावा केला का? असा प्रश्न विचारला असता उत्तर देण्याचे टाळून ‘माझे सचिव आपल्याला दूरध्वनी करतील,’ असे सांगून दूरध्वनीवरील संभाषणच खंडीत केले. तर महापौर सुनिल प्रभू यांनी ही जबाबदारी स्मारक समितीची असून शासकीय नियमानुसार पालिका पुतळ्याची डागडुजी करते, असे सरकारी खाक्याचे उत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा