मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि मार्च २०२० मध्ये सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली. यात मुंबईकरांचे मनोरंजन करणाऱ्या नाटय़गृहांचाही समावेश होता. तब्बल दोन वर्ष दोन महिने करोना काळाचा अंधार सोसल्यानंतर दादरचे प्रसिध्द श्री शिवाजी नाटय़मंदिर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.
नूतनीकरण झालेल्या या नाटय़गृहाचा शुभारंभ सोहळा ३ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. नवे रंग-रुप घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार असलेले शिवाजी मंदिर नाटय़गृह सुरू झाल्याने गेले दोन वर्ष दादर आणि परिसरातील नाटय़प्रेमींची उपासमार संपली असून निर्मात्यांमध्येही उत्साह संचारला आहे.
दादर परिसरात शिवाजी मंदिर नाटय़गृह आणि यशवंतराव चव्हाण नाटय़संकुल या दोन नाटय़गृहांमध्ये नाटकांचे प्रयोग लावले जातात. मात्र गेली दोन वर्ष ही दोन्ही नाटय़गृहे बंद आहेत. करोनाकाळातील बंदी आणि निर्बंध शिथिल झाल्यानंतर नाटक व्यवसायाची सुरूवात झाली, मात्र ही दोन्ही नाटय़गृहे बंदच होती. त्यामुळे दादर आणि परिसरातील हक्काच्या प्रेक्षकांवर निर्मात्यांना पाणी सोडावे लागले होते. ‘करोना काळात दोन वर्ष नाटय़गृह बंद होते. त्यामुळे त्याची दुरुस्ती – डागडुजी करणे गरजेचे झाले होते. दुरूस्ती करून नाटय़गृह सुरू करण्यापेक्षा संपूर्ण नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून आता नाटय़गृह सज्ज आहे’, अशी माहिती शिवाजी मंदिरचे चिटणीस बजरंग चव्हाण यांनी दिली. नाटय़गृहाची आतील सजावट नव्याने करण्यात आली आहे. रंगमंचाचे नूतनीकरण करण्यात आले असून ध्वनी यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात आली आहे. डिजिटल ध्वनीयंत्रणा शिवाजी मंदिर नाटय़गृहात बसवण्यात आली असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
अक्षय्य तृतियेचा मुहूर्त
अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर नाटय़गृहाचा अधिकृत शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाटय़गृहाचा ५८ वा वर्धापनदिनही असल्याने हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. प्रसिध्द नाटय़दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘संज्या छाया’ या नाटकाचा पहिला प्रयोग त्यादिवशी रंगणार आहे.
निर्मात्यांच्या आग्रहाखातर..
सुट्टीचा हंगाम असल्याने सध्या शनिवार – रविवार नाटकाचे प्रयोग असतात. त्यामुळे नाटयनिर्मात्यांच्या आग्रहाखातर ३० एप्रिल आणि १ मे या दोन्ही दिवशी शिवाजी मंदिरमध्ये ‘अलबत्या गलबत्या’, ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’, ‘दादा गुड न्यूज आहे’, ‘आमने सामने’ अशा नाटकांचे प्रयोग होणार असले तरी अधिकृतरित्या सुरूवात ३ मे लाच होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.