मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील १२३ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, माजी अध्यक्ष शिवाजी नलावडे यांच्यासह संचालक मंडळावंर फसणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माता रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे या घोटाळ्याचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
 मुंबई बँकेत २०१३ मध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचे ‘लोकसत्ताने’ पुराव्यासकट उघडकीस आणले होते. भाजपचे कार्यकर्ते आणि वकील विवेकानंद गुप्ता यांनी या बातमीनंतर विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडून माहिती अधिकारात बॅंकेच्या व्यवहार तपासणीचे अंतरिम अहवाल, सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांकडून तपासणी अहवाल आणि इतर कागदपत्रे मिळवली होती. बँकेने १९९८ पासून बॅंकेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि संचालकांनी पदाचा गैरवापर करून कोटय़ावधी रुपयांचा घोटाळा केल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी माता रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून विद्यमान अध्यक्ष आणि माजी आमदार प्रवीण दरेकर, माजी अध्यक्ष आणि संचालक शिवाजी नलावडे तसेच प्रकाश शिरवाडकर, राजा नलावडे आदींसह संचालकांवर १२३ कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशी झाली फसवणूक
*बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी नलावडे यांच्या काळात त्यांचे पुत्र राजा यांची निधी विभाग व्यवस्थापक म्हणून बेकायदेशीर नियुक्ती
* बँकेची गुंतवणूक असलेल्या १७२ कोटी मूल्याचे कर्ज रोखे १६५.४४ कोटी मध्ये विकण्याचा निर्णय घेतल्याने  बॅंकेस ६.६ कोटी रुपयांचे नुकसान
*पदाचा गैरवापर करून कर्मचारी बँक निधीचा गैरवापर
* १९९८ ते १९९९ मध्ये मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या मुदत ठेवी मध्ये ११० कोटींची बेकायदेशीर गुंतवणूक केल्याने बॅंकेचे आर्थिक नुकसान
*२०११-१२ मध्ये बॅंकेने एकाच दिवशी बनावट अर्जाद्वारे ७४ मजूर संस्थांना सदस्यत्व दिल्याचे अंतरिम अहवालात नमूद
*जून २०१२ मध्ये बॅंकेतर्फे डिझास्टर रिकव्हरी साइटचा बेकायदेशीर ठेका दिल्याने बंॅकेचे कोटय़वधींचे नुकसान आणि अध्यक्ष, संचालकांचा आर्थिक फायदां