शिवाजी पार्कवर आता कोणतेच अतिक्रमण नको, आणि शिवाजी पार्कचे नामांतरही नको, ही स्थानिक रहिवाशांची भावना लक्षात घेऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आता आपली भूमिका ‘रोखठोक’पणे स्पष्ट करावी, अशी मागणी शिवाजी पार्कवासीयांकडून होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका स्पष्ट केली तरच शिवाजी पार्क परिसरात सध्या असलेले तणावपूर्ण वातावरण संपुष्टात येईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचे नाव या मैदानाला दिले असताना तेच बदलण्याची मागणी शिवसेनेतून होऊच कशी शकते असा सवालही दादरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास स्पष्ट विरोध केला आहे. बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले ती जागाही शिवसेनेकडून अद्यापि मोकळी करून पालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. स्मारकप्रकरणी शिवसैनिकच निर्णय घेतील, त्याच्या मध्ये मी येणार नाही, या उद्धव यांच्या विधानामुळे संभ्रम आणखी वाढला आहे. तसे वातावरण न ठेवता, स्मारक व नामांतर या मुद्दय़ांवर नेमकी व निसंदिग्ध भूमिका त्यांनी जाहीर करावी, अशी स्थानिकांची भावना असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवते.     

Story img Loader