मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेतला असता तर शिवाजी पार्क अपुरं पडलं असतं असं विधान शिंदे गटातील आमदार आणि शिंदे सरकारमधील नेते दादा भुसे यांनी केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये निकाल देताना शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाची याचिका ग्राह्य धरु नये यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळू लावली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला काही अटी आणि शर्थींच्या आधारे मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. याच निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी भुसे यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यासंदर्भात भाष्य करताना हे विधान केलं.

नक्की वाचा >> दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंना परवानगी मिळाल्यानंतर सुषमा अंधारेंचा CM शिंदेंना टोला; म्हणाल्या, “खरा शिवसैनिक सुरतला पळून…”

मुंबई उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गटाला परवानगी दिल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देताना दादा भुसे यांनी या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयानुसार आम्ही शिंदे गटाचा मेळावा कुठे घ्यायचा हे निश्चित करु असं म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात बोलताना भुसे यांनी, “असा निर्णय न्यायालयाने घेतला असेल तर आपण त्याच्या अंमलबजावणीचं काम केलं पाहिजे. हा निर्णय तपासून पाहिला जाईल आणि त्यानुसार मार्गक्रमण करु,” असं सांगितलं. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून लावल्यासंदर्भातही भाष्य केलं. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांची याचिका फेटाळणे हा त्यांना मोठा फटका मानला जातोय, असं म्हणत भुसेंकडे विचारपूस करण्यात आली. त्यावर उत्तर देताना भुसेंनी, “असं फटका वगैरे काही नसतं. न्यायालयात दाद मागणं लोकशाहीत अभिप्रेत आहे. न्यायालयाला जे योग्य वाटलं ते निर्णय करत असतं,” सांगितलं.

शिंदे गटाचा मेळावा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील कुठे घेतला जाणार हे लवकरच ठरवलं जाईल असंही भुसे यांनी स्पष्ट केलं. “मेळावा कसा करायचा कुठे करायचा याबद्दल निर्णय शिंदे घेतील तसा भव्य मेळावा घेतला जाईल,” असं भुसे यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटाच्या मेळाव्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासंदर्भात विचारलं असता भुसे यांनी, “शक्ती प्रदर्शन वगैरे काही भाग नसतो,” असं उत्तर दिलं.

पुढे बोलताना भुसे यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. “सध्याच्या घडीला शिवसैनिकांत मुख्यमंत्र्यांबद्दल आनंदचं, उत्साहाचं वातावरण आहे. शिंदेंच्या मेळाव्याला शिवाजी पार्क अपुरं पडलं असतं,” असं विधान शिंदेंनी केलं. “शिंदे ज्या जागेची निवड करतील तिथे आनंदात, भव्यदिव्य दसरा मेळावा संप्पन होईल,” असंही भुसेंनी सांगितलं.

Story img Loader