मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पाचे (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर शनिवारी सकाळी ८ वाजता सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला झाला. पहिल्या दिवशी (सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या सागरी सेतूवरून तब्बल ८,१६४ वाहनांनी प्रवास केला. मात्र एमएमआरडीएला पथकराद्वारे किती महसूल मिळाला याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी सागरी सेतूवरून सफर करण्याचा आनंद लुटला, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी सांगतिले.
मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास २० ते २२ मिनिटात करता यावा यासाठी एमएमआरडीएो २१.८० किमी लांबीचा शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू बांधला असून या सागरी सेतूसाठी १७ हजार ४०० कोटी (वाढीव खर्च अंदाजे २१ हजार कोटी) खर्च आला. हा खर्च वसूल करण्यासाठी एमएमआरडीएने या सागरी सेतूवरील प्रवासासाठी पथकर लागू केला आहे. शिवडी – गव्हाण (चिर्ले) दरम्यान एकेरी प्रवासासाठी २५० रुपये पथकर भरावा लागणार आहे. तर दुहेरी प्रवासासाठी ३७५ रुपये पथकर भरावा लागणार आहे. पथकर अधिक असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. मुळात पथकर लागत असल्याने प्रवासी, वाहनचालकांकडून भविष्यात कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा >>>भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी मुंबईकर थक्क, तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा दर्शन घडले
दरम्यान, या सागरी सेतूवरून २०२४ मध्ये दिवसाला ३९ हजार ३०० वाहने धावतील, असे एका अहवालानुसार सांगितले जात आहे. तर २०३२ पर्यंत एक लाख ३ हजार वाहने धावतील, असाही दावा केला जात आहे. आता हा दावा कितपत खरा ठरतो हे येणाऱ्या काळात समजेल. पण पहिल्या दिवशी शनिवारी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी ( सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ) ८,१६४ वाहनांनी सागरी सेतूवरून प्रवास केला. यातून एमएमआरडीएला पथकराद्वारे किती महसूल मिळाला याची माहिती २४ तासानंतर उपलब्ध होते. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या महसुलाची माहिती रविवारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सागरी सेतू पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी मुंबईकरांची गर्दी
पहिल्या दिवशी सागरी सेतूवरून ताशी १०० किमी वेगाने प्रवास करण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. त्यामुळे सागरी सेतू खुला होताच यावरून वाहने धावू लागली. एकीकडे पहिल्या दिवशी सागरी सेतूवरून प्रवास करण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे देशातील सर्वात लांब असा सागरी सेतू पाहण्यासाठी मुंबईकरांनी शिवडी येथे सकाळपासून गर्दी केली होती. अनेक जण केवळ सागरी सेतूची झलक पाहण्यासाठी आले होते. सेल्फी, छायाचित्र काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर वाहनांमधून सागरी सेतूवरून प्रवास करणारे अनेक वाहनचालक – प्रवासी मध्येच उतरून छायाचित्र, सेल्फी काढण्यात दंग होते.
हेही वाचा >>>कामगार बेरोजगार होतील म्हणून प्रकल्प सुरू ठेवता येऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; जनरल मोटर्स प्रकल्प प्रकरण
वाहतूक पोलिसांची गस्त आवश्यक
सागरी सेतू पाहण्यासाठी आणि या सेतूवरून प्रवास करण्यासाठी शनिवारी मोठ्या संख्येने मुंबईकरांनी गर्दी केली होती. अनेक जण सेतूवर मध्येच उतरून छायाचित्र, सेल्फी काढत होते. या सेतूवर ताशी १०० किमी वेगमर्यादा असताना असे मधेच थांबून छायाचित्र काढणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे हा नियमांचा भंग आहे. अशा प्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांनी आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गस्त घालणे, अशा प्रवासी – वाहनचालकांना रोखणे आणि त्यांच्याविरोधात करावाई करण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
एमएमआरडीए, एमएसआरडीकडून लूट, पथकर अभ्यासकांचा आरोप
शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतूसाठी १७ हजार ४०० कोटी इतका खर्च आला आहे. असे असताना या सागरी सेतूवरून एकेरी प्रवास करण्यासाठी २५० रुपये पथकर मोजावा लागणार आहे. दुहेरी प्रवासासाठी ३७५ रुपये पथकर भरावा लागणार आहे. असे असताना २००० कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांहून अधिक पथकर वसूल झाला आहे. अजूनही येथे पथकर वसूल करण्यात येत असून २०३० पर्यंत ही वसुली सुरूच राहणार आहे. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून दुहेरी प्रवास करण्यासाठी ४६० रुपये पथकर आकारण्यात येतो. एकूणच सागरी सेतूचा पथकर अधिक आहे. पण त्याहून अधिक पथकर मुंबई – द्रुतगती महामार्गावरून जाताना मोजावा लागत आहे. हा पथकर कशाच्या आधारावर वसूल करण्यात येतो, असा प्रश्न पथकर अभ्यासक विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. एमएमआरडीएकडून पथकराच्या नावे लूट सुरू आहे, तर एमएसआरडीसीकडून महालूट करीत आहे, असा आरोप आरोप त्यांनी केला आहे.