डॉक्टरचा दूरध्वनी क्रमांक सर्च इंजिनवर शोधणे ३० वर्षीय तरूणाला भलतेच महागात पडले. सायबर भामट्यांनी त्याच्या खात्यावरील पैसे इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केले. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गगन चौधरीला पश्चिम बंगालमधून अटक केली असून याप्रकरणातील मुख्य आरोपीने आतापर्तंत १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा >>> ‘प्लेन हायजॅक का सारा प्लानिंग हो चुका है’; विमान अपहरणाविषयी मोबाइलवर संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
तक्रारदार ३० वर्षीय तरूण एका कंपनीत पर्यवेक्षक पदावर कार्यरत आहे. त्याच्या मालकाला मधुमेह आणि अन्य व्याधी आहेत. या व्याधींवर उपचार करण्यासाठी मालकाला डॉक्टरांकडे जायचे होते. त्यानुसार तक्रारदाराने गुगलवर शोध घेतला असता त्याला डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक सापडला. त्या क्रमांकावर संपर्क साधून तरूणाने चौकशी केली. डॉक्टरांना भेटण्यासाठी एसएमएसद्वारे आलेल्या लिंकवर तरूणाने याने क्लिक करताच त्याच्या बँक खात्यातून २१ हजार ३०० रुपये हस्तांतरित झाले.
हेही वाचा >>> मुंबई: प्रेमसंबंधाचा संशय घेणाऱ्या पतीची हत्या
ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने शिवडी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झाले. या पथकाने सापळा रचून आरोपी गगन चौधरीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाइल, चार सीम कार्ड, चेकबूक जप्त केले. याप्रकरणातील मुख्य आरोपीने अशा पद्धतीने देशभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी अंकित अगरवाल सध्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासादरम्यान निपष्पन्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.