पंढरपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. याच सभेतून परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या एका बसला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकासह सगळे शिवसैनिक सुखरुप आहेत. पंढरपूर-मिरज रस्त्यावरच्या नागज फाट्याजवळ ही घटना घडली. पंढरपूरमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
पंढरपूरच्या सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दाखल झाले होते. एसटी महामंडळाची एक बसही शिवसैनिकांनी भाडे तत्त्वावर घेतली होती. सभा झाल्यावर काही शिवसैनिक या बसनेच परतत होते. त्यावेळी नागज फाट्याजवळ या बसने पेट घेतला. या बसमध्ये 42 शिवसैनिक होते त्यांच्यापैकी कोणालाही काहीही इजा झाली नाही. बस क्रमांक MH14 0728 या बसने अचानक पेट घेतला. ही बस गारगोटी आगाराची असल्याचीही माहिती समजते आहे.