हजारो कोटींचा सिंचन घोटाळा, श्वेतपत्रिकेचे नाटक, राज्य मंत्रिमंडळामधील पाच भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न होणे आणि मराठवाडय़ाला पुरेसे पाणी उपलब्ध करून न देणे यासह विविध मुद्दय़ांवर शिवसेनेने नागपूर विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यासाठी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे.
सिंचनामध्ये हजारो कोटींचा घोटाळा होऊनही श्वेतपत्रिकेमध्ये मात्र त्याचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: श्वेतपत्रिकेबाबत नाराज आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, गुलाबराव देवकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत आदी मंत्र्यांवर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही आज ते मंत्रिमंडळात सुखेनैवपणे वावरत आहेत. त्याचप्रमाणे मराठवाडय़ाला पुरेसे पाणी देण्यात येत नाही. यासह विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय आदी अनेक मुद्दय़ांवरून शिवसेनेने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केल्याचे शिवसेना गटनेते सुभाष देसाई यांनी आज सांगितले. शिवसेनेच्या अविश्वास ठरावाला भाजपसह सर्व विरोधी पक्ष पाठिंबा देतील असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. शिवसेनेने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाबाबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी आपली चर्चा झाल्याचे देसाई म्हणाले.     

Story img Loader